नाशिक सिंहस्थ कुंभमेळा बनावट टेंडर प्रकरण: मंत्री गिरीश महाजन यांनी नैतिकता उरल्यास राजीनामा द्यावा – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष

नाशिक सिंहस्थ कुंभमेळा

सीबीआय चौकशी करून आरोपींचे सीडीआर तपासण्याची जोरदार मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र आक्रमक पवित्रा

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर व निविदा तयार करून कंत्राटदारांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात थेट मंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा आणि कार्यकर्त्यांचा सहभाग निष्पन्न होत असल्याने, मंत्री गिरीश महाजन यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) शहर आणि जिल्हा शाखेतर्फे करण्यात आली आहे. राजीनामा न दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष अशोक एस. लाडवंजारी, कार्याध्यक्ष संग्रामसिंह सूर्यवंशी, युवक अध्यक्ष विनायक पाटील, माजी नगरसवेक राजुभाऊ मोरे, सुनील भैय्या माळी, किरणभाऊ राजपूत, गोपाल पाचवणे, गिरीश सांगळे लाडवंजारी, सुहास चौधरी, संजय जाधव, अमोल कोल्हे, राहुल टोके यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेद्वारे किंवा निवेदनाद्वारे तीव्र संताप व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रांमध्ये कुंभमेळा टेंडर प्रक्रियेबाबतच्या बातम्या जोरदारपणे झळकत आहेत. जामनेर येथील काही व्यक्ती, मंत्र्यांचे जवळचे नातेवाईक आणि भाजप कार्यकर्त्यांनी संगनमत करून आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने साफसफाई, भोजन, पाणी वितरण आणि इतर साहित्य पुरवठ्याच्या बनावट निविदा व कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर्स) मक्तेदारांना देऊन मोठ्या रकमेची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी यापूर्वीच पावले उचलली असून पीडित मक्तेदारांनी पोलिसांत फिर्यादीही दाखल केल्या आहेत.

या संपूर्ण प्रकारानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जळगाव जिल्ह्यातील वर्तमानपत्रे, सोशल मीडिया आणि जागृत नागरिकांनी तो प्रयत्न हाणून पाडला आणि जनतेसमोर वास्तव आणले, असा दावा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या प्रकरणात मंत्री महाजनांचे जवळचे रक्तातील नातेवाईक व भाजप कार्यकर्ते पोलीस तपासात जाळ्यात अडकत असून, सोशल मीडियावरून मंत्र्यांसोबतचे फोटो झटपट डिलीट करण्यात आल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

या सर्व घोटाळ्यात आणखी बड्या व्यक्तींचा सहभाग असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय किंवा सीबीआय चौकशी करण्यात यावी आणि आरोपींच्या मोबाईलचे सीडीआर (CDR) तपासावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे. मंत्र्यांच्या आशीर्वादाने जिल्ह्यात अवैध धंदे आणि अनाकलनीय व्यवहार सुरू असल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला असून, मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नेत्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here