सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अकलूज पोलीस ठाण्याने बेकायदेशीर अग्निशस्त्रांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी १७ देशी बनावटीची पिस्तूल, ४७ जिवंत काडतुसे आणि एक टाटा नेक्सॉन कार असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ६ आरोपींना जेरबंद केले आहे.
अकलूज-टेंभुर्णी रस्त्यावरील संगम (ता. माळशिरस) येथील पतंगे मटन हॉटेलजवळ एक इसम कारमधून गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती अकलूज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विकास कैलास वजाळे (रा. परीते, ता. माढा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २ पिस्तूल, ४ जिवंत राउंड आणि कार असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपी विकास वजाळेकडे सखोल चौकशी केली असता त्याने ही शस्त्रे राहुल सतीश माने (रा. मिरज, जि. सांगली) याच्या साथीने अनिल पंचलाल मेहता (रा. रांजणगाव, जि. बडवानी, मध्यप्रदेश) याच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे धाव घेऊन मध्य प्रदेशातील मुख्य पुरवठादार अनिल मेहता याला ४ पिस्तूल व २५ काडतुसांसह शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर टेंभुर्णी परिसरातून राहुल माने यालाही बेड्या ठोकल्या. राहुल मानेकडून आणखी ६ पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
अटक आरोपी (६): विकास कैलास वजाळे (वय ३१, ता. माढा), राहुल सतीश माने (वय ३४, मिरज), महादेव बाळासाहेब कोरके (वय ३०, करकंब, ता. पंढरपूर), विजय सदाशिव किरणगी (वय ३४, रा. शिवणूर, ता. आटणी, जि. बेळगाव, कर्नाटक), अनिल पंचलाल मेहता (वय ३२, जि. बडवानी, मध्य प्रदेश), सुमित नाना लवटे (वय १९, ता. सांगोला). सर्व आरोपींना न्यायालयाने २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
फरार आरोपी (२): प्रदीप पांडुरंग माने (रा. चिकमहूद, ता. सांगोला) व शनी भारत बनसोडे (रा. अकोले खुर्द, ता. माढा) यांचा पोलीस शोध घेत आहेत. जप्त मुद्देमाल:देशी बनावटीचे १७ पिस्तूल (किंमत ₹१०,००,०००/-) ४७ जिवंत काडतुसे/राउंड (किंमत ₹४७,०००/-) टाटा नेक्सॉन कार क्र. MH 45 AE 7002 (किंमत ₹८,००,०००/-) एकूण जप्त किंमत: ₹१८,४७,०००/-
ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सपोनि विक्रम साळुंखे, सपोनि अंकुश वाघमोडे, पोउपनि विशाल कदम व त्यांच्या पथकाने पार पाडली. पुढील तपास सपोनि विक्रम साळुंखे करत आहेत.







