एस.सी.आरक्षणाच्या ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणासाठी ९ सप्टेंबरला सोलापुरात मातंग समाजाचा भव्य महामोर्चा

मातंग

मंगळवेढ्यात रणनीतीसाठी सहविचार बैठक संपन्न; माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । अनुसूचित जाती आरक्षणाचे तत्काळ ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण लागू करून मातंग आणि इतर ५७ जातींना न्याय द्यावा, या मागणीसाठी ‘सकल मातंग समाज, सोलापूर’च्या वतीने बुधवार, ९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर शहरात भव्य ‘महामोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी मंगळवेढ्यातील जिजामाता प्राथमिक शाळेत मातंग समाजाची विशेष सहविचार बैठक उत्साहात पार पडली. सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली.

 

सर्वोच्च न्यायालयाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयानुसार राज्यांना अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याचे अधिकार दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मातंग समाजाचे शैक्षणिक, सामाजिक आणि नोकरीविषयक हक्क अबाधित राखण्यासाठी उपवर्गीकरण तातडीने लागू करणे गरजेचे असून, समाजाने संघटित लढा उभारण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
हा मोर्चा सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू होईल. तेथून नवी वेस पोलीस चौकी, महात्मा फुले पुतळा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, रामलाल चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पूनम गेटमार्गे जिल्हा परिषद कार्यालय, सोलापूर येथे पोहोचून मोर्चाचा समारोप होईल.
नोकरभरती स्थगिती: अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू होत नाही, तोपर्यंत राज्यातील कोणतीही शासकीय नोकरभरती करू नये. मागासलेपणावर आधारित वर्गीकरण: तेलंगणा, हरियाणा, कर्नाटक आणि पंजाबच्या धर्तीवर लोकसंख्या व मागासलेपणाचे निकष लावून मातंग आणि वंचित घटकांना लाभ देणारा कायदा करावा.
१९७८ ते २०२६ या कालावधीत ‘बार्टी’मार्फत (BARTI) जातनिहाय देण्यात आलेल्या लाभांची श्वेतपत्रिका तत्काळ प्रसिद्ध करावी. राज्य मागास आयोग, महिला आयोग व बार्टी यांनी शासकीय, निमशासकीय आणि निवृत्त अनुसूचित जातीच्या कर्मचाऱ्यांची जातनिहाय आकडेवारी जाहीर करावी.
या बैठकीस चेअरमन अभिजीत ढोबळे, सकल मातंग समाज राज्य समन्वयक सुरेश आप्पा पाटोळे, ॲड. अभिषेक कांबळे, लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव देविदास कसबे, नगरसेविका विद्यागौरी अवघडे, गोविंद कांबळे, सुहास शिंदे, पृथ्वीराज मोरे, सुस्ते गावचे सरपंच विशाल कसबे, राहुल मस्के, अशोक रणदिवे, खंडू खंदारे, प्रकाश खंदारे, जनार्दन अवघडे, मल्हारी कांबळे, डीजे शांतिनाथ साबळे यांच्यासह मंगळवेढा सकल मातंग समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हक्काचा न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा देत समाजबांधवांनी ‘चलो सोलापूर’चा नारा देऊन या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मातंग समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here