‘माझ्या हातचा गणपती’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाली संधी; उत्कृष्ट गणेशमूर्ती होणार शाळेत विराजमान

माझ्या हातचा गणपती

सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी ‘माझ्या हातचा गणपती’ हा अभिनव उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाडू मातीचा वापर करून स्वतःच्या कल्पकतेतून विविध पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या.

विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेत आपल्या कलाकौशल्याचा आणि कल्पनाशक्तीचा सुंदर आविष्कार घडवून आणला. पारंपरिक स्वरूपापासून ते विविध कल्पनांवर आधारित गणेशमूर्ती विद्यार्थ्यांनी तयार केल्या. शाडू मातीचा वापर केल्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गणेशमूर्तींचे परीक्षण करून त्यामधून उत्कृष्ट गणेशमूर्तीची निवड करण्यात येणार असून, निवड झालेली मूर्ती शाळेत गणेशोत्सवासाठी स्थापन केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या हाताने साकारलेला गणराय शाळेत विराजमान होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न ठेवता त्यांना प्रत्यक्ष व्यासपीठ देण्याचा हा उपक्रम असल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. ‘माझ्या हातचा गणपती’ या उपक्रमातून कला, संस्कार आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम साधला जात आहे. मुख्याध्यापक मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here