सातारा शहर डी.बी. पथकाची धडक कारवाई; माय-लेकासह ९ बॅटऱ्या व दुचाकी ताब्यात
सातारा (उपसंपादक अरुण मोरे) | सातारा शहरात गेल्या काही दिवसांपासून चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) पथकाने धडक कारवाई करत बॅटऱ्या चोरणाऱ्या माय-लेकास ताब्यात घेतले आहे. संशयितांकडून १ लाख १० हजार रुपये किमतीच्या ९ बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेली विना नंबरची दुचाकी जप्त करण्यात आली आहे.रोहित शिवाजी जाधव (वय २४) आणि सुरेखा शिवाजी जाधव (वय ४५, दोघे रा. गोसावी वस्ती, सैदापूर, ता. जि. सातारा) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी बॅटरी चोरांचा छडा लावण्याच्या सूचना डी.बी. पथकाला दिल्या होत्या. त्याअनुषंगाने डी.बी. पथक शहरात रात्रीची गस्त घालत असताना दि. १० सप्टेंबर रोजी एक इसम व महिला विना नंबरच्या दुचाकीवरून संशयास्पदरीत्या काही वस्तू घेऊन जात असताना आढळले. पोलिसांनी त्यांना थांबवून झडती घेतली असता त्यांच्याकडे चारचाकी वाहनांच्या दोन बॅटऱ्या मिळून आल्या. वाहनाची कोणतीही कागदपत्रे त्यांच्याकडे नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी गेल्या महिन्याभरात सातारा शहर परिसरातून आणखी ७ चारचाकी वाहनांच्या बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ९ बॅटऱ्या व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त केलेल्या बॅटऱ्या व दुचाकीबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, डीवायएसपी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सागर गायकवाड, सुहास कदम, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे आणि वैभव माने यांनी केली.







