दोन दरोडे व १९ घरफोड्यांचे गुन्हे दाखल; सोलर कॉपर वायर चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर (क्राइम रिपोर्टर राहुल म्हस्के):महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात दोन दरोडे व तब्बल १९ घरफोड्यांच्या गुन्ह्यांत पोलिसांना हवा असलेला कुख्यात सराईत गुन्हेगार सचिन उर्फ सच्या अभिमान उर्फ अभिमन्यू काळे याला सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोहोळ येथून शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून मोहोळ पोलीस ठाण्यातील सोलर कॉपर वायर चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, त्याच्याकडून ५७ हजार ६०० रुपये किमतीची ४८ किलो कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पथके शोध घेत होती. सोलापूर उपविभागात गस्त घालत असताना, मोहोळ पोलीस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला संशयित आरोपी सोलापूर–पुणे महामार्गावरील मोहोळ येथील वैरागकडे जाणाऱ्या पुलाखाली संशयितरीत्या फिरत असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सापळा रचला आणि संशयितास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सचिन उर्फ सच्या अभिमान उर्फ अभिमन्यू काळे (वय ३२ वर्षे, रा. एकतानगर, सापगरूड गल्ली, जत, जि. सांगली; सध्या रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे सांगितले. त्याला अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने साथीदार बाबा छपऱ्या काळे (रा. यल्लमवाडी, ता. मोहोळ) याच्या मदतीने मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोलर कॉपर वायर चोरीचे दोन गुन्हे (गु.र.नं. ५८८/२०२६ आणि ४०५/२०२६) केल्याची कबुली दिली.
आरोपी सचिन काळे याचा गुन्हे अभिलेख तपासला असता, त्याच्यावर महाराष्ट्र व तेलंगणा राज्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, बार्शी तालुका, वैराग आणि कामती पोलीस ठाण्यांत दरोडा व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय तेलंगणा राज्यातील मेहबूबनगर ग्रामीण पोलीस ठाण्यात ११ गुन्हे आणि मेहबूबनगर शहरात २ गुन्हे असे एकूण घरफोडीचे १३ गुन्हे दाखल असून, दोन्ही राज्यांच्या पोलिसांना तो हवा होता.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड, पोलीस हवालदार सलीम बागवान, हरिदास पांढरे, वीरेश कलशेट्टी, नागेश काणदे, व्यंकटेश मोरे, जगदीश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पवार, योगेश जाधव, कपिल काटकर, सुनील पवार, अशोक हलसंगी, महिला पोलीस कॉन्स्टेबल सुनंदा झळके, पल्लवी इंगळे-पाटील तसेच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गणेश नाळे यांनी सहभाग घेतला.







