रिक्षाच्या स्टेअरिंगवरून न्यायालयाच्या आवारात: शिर्डीच्या आकाश जाधव यांची गरुडभरारी; रिक्षा चालवत पूर्ण केली एलएल.बी.

शिर्डीच्या आकाश जाधव

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) । परिस्थिती कितीही हलाखीची असली तरी अफाट मेहनत आणि दृढनिश्चयाच्या जोरावर अशक्य वाटणारे ध्येय साध्य करता येते, हे शिर्डी येथील नवोदित विधिज्ञ अ‍ॅड. आकाश जाधव यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. शिर्डीच्या रस्त्यांवर ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह सांभाळत त्यांनी कायद्याचे (LL.B.) उच्च शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, आता ते न्यायालयात वकिली करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिर्डी व परिसरातून त्यांचे मोठे कौतुक होत आहे.

अ‍ॅड. आकाश जाधव यांची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत सर्वसामान्य आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी तरुण वयातच ऑटोरिक्षा चालवण्याचा मार्ग निवडला. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांची प्रामाणिकपणे सेवा करत मिळालेल्या पैशांतून त्यांनी आई-वडिलांच्या संसाराला हातभार लावला. दिवसभराच्या धकाधकीच्या आणि कष्टाच्या दिनक्रमातही त्यांनी शिक्षणाची आवड जिवंत ठेवली. दिवसा रिक्षाचे स्टेअरिंग सांभाळत असतानाच रात्री कायद्याचा सखोल अभ्यास करून त्यांनी जिद्द, चिकाटी आणि अखंड परिश्रमाच्या बळावर एलएल.बी. पदवी संपादन केली.
रिक्षाचालक ते वकील अशा खडतर व प्रेरणादायी प्रवासाचा टप्पा गाठल्याबद्दल अ‍ॅड. आकाश जाधव यांचा मित्रपरिवारातर्फे नुकताच सन्मान करण्यात आला. भाजप ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष गणेश खैरे यांच्या पुढाकाराने आयोजित या सोहळ्यात अ‍ॅड. जाधव यांच्या संघर्षमय प्रवासाचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी मुंबई उच्च न्यायालयाचे अ‍ॅड. विक्रांत वाघचौरे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप वैद्य, दत्ता देवकर, दत्तात्रय शेलार, पत्रकार देविदास खरात, पप्पू इंगावले, दीपक मांजरेकर, संतोष सोनवणे, सोमनाथ कानडे, मधुकर पिलगर यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘परिस्थितीपेक्षा माणसाची जिद्द मोठी असते’ असा प्रत्यय देणारा अ‍ॅड. जाधव यांचा हा प्रवास समाजातील आर्थिक विवंचनेत असणाऱ्या व स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या होतकरू युवकांसाठी दिशादर्शक ठरला आहे. उपस्थित मान्यवरांनी यावेळी अ‍ॅड. जाधव यांना वकिलीच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here