सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | दागिने घडवण्यासाठी सराफाकडून घेतलेले तब्बल १७ तोळे (१७० ग्रॅम) चोख सोने घेऊन पोबारा करणाऱ्या पश्चिम बंगालच्या एका कारागिराला मंगळवेढा पोलिसांनी हैद्राबाद (तेलंगणा) येथून बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्याच्याकडून १९ लाख २४ हजार रुपये किमतीचे १३ तोळे सोने जप्त केले असून, दुसऱ्या फरार साथीदाराचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी दिलीप घाडगे यांचे मंगळवेढा येथे ‘बालाजी ज्वेलर्स’ नावाचे सराफ दुकान आहे. आरोपी कुतुबुद्दीन उर्फ हिसाबोद्दीन रहीम मौला (वय ३६ वर्षे) आणि शहाबुद्दीन रहीम मौला (दोघे रा. ठाकुरात, बारा कमलापूर, हुगळी, बोरा, पश्चिम बंगाल) हे दोघे त्यांच्याकडे गेल्या १० वर्षांपासून सोन्याचे दागिने बनवण्याचे काम करत होते. दरम्यान, आरोपी क्रमांक १ हा वर्षभरापूर्वी अकलूज येथे राहण्यास गेला होता.
फिर्यादी यांनी आरोपींना दागिने तयार करण्यासाठी १६ जुलै २०२६ रोजी १२९.८५० ग्रॅम, १९ ऑगस्ट २०२६ रोजी २५.७३० ग्रॅम आणि ३० ऑगस्ट २०२६ रोजी १४.४२० ग्रॅम असे एकूण १७० ग्रॅम (सुमारे १७ तोळे) चोख सोने दिले होते. १५ दिवसांत दागिने बनवून देण्याचे आश्वासन कारागिरांनी दिले होते. मात्र, ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत दागिने न मिळाल्याने फिर्यादीने आरोपी क्रमांक २ ला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद लागला. त्यानंतर फिर्यादीने मंगळवेढा व अकलूज येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन पाहिले असता आरोपी तिथून पसार झाल्याचे उघडकीस आले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने मंगळवेढा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(३), ३(५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ८६०/२०२६ दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मुख्य आरोपी कुतुबुद्दीन उर्फ हिसाबोद्दीन रहीम मौला याला हैद्राबाद (तेलंगणा) येथून शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडून १९ लाख २४ हजार रुपये किमतीच्या ८० ग्रॅम आणि ५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन लगडी (एकूण १३० ग्रॅम म्हणजेच सुमारे १३ तोळे सोने) जप्त करण्यात आल्या आहेत. या गुन्ह्यातील दुसऱ्या फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची धडक कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती प्रेरणा कट्टे आणि मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलीस उपनिरीक्षक अशोक बाबर, पोलीस कॉन्स्टेबल २७० महेश पोरे, पोलीस कॉन्स्टेबल ९२१ विनायक जाधव आणि अकलूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे (तांत्रिक मदत) यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक बाबर करत आहेत.







