स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त
जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्यात ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत अवैध अंमली पदार्थांच्या विक्रीविरुद्ध मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. याच मोहिमेअंतर्गत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी-तरसोद बायपासलगतच्या कचरा फॅक्टरी परिसरात धाड टाकून तब्बल ६४.४४ ग्रॅम एमडी (MD) या घातक अंमली पदार्थासह एका सराईत गुन्हेगारास रंगेहात जेरबंद केले आहे. या कारवाईत एकूण २ लाख १३ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोललीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी जळगाव जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रभावी कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील पाळधी-तरसोद बायपासजवळ असलेल्या कचरा फॅक्टरी परिसरात अजय बिरजू गारुंगे (रा. तांबापुरा कंजरवाडा, मेहरुण, जळगाव) हा तरुण एमडी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली. या माहितीची खात्री करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक १ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १४:२० वाजता संबंधित परिसरात सापळा रचून आरोपी अजय गारुंगे यास ताब्यात घेतले.
झडती दरम्यान आरोपीजवळून ६४.४४ ग्रॅम वजनाचा एमडी अंमली पदार्थ: अंदाजे किंमत १,९३,३२०/- रुपये. मोबाईल फोन: अंदाजे किंमत २०,०००/- रुपये असा एकूण जप्त २,१३,३२०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासणीदरम्यान असे निष्पन्न झाले की, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीविरुद्ध यापूर्वी एमडी व गांजा बाळगणे/विक्री करणे तसेच घरफोडी यांसारखे तब्बल ३५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात आता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २९५/२०२६ नुसार एनडीपीएस कायदा कलम ८ (क), २२(क) अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीसोबत असलेल्या आणखी दोन संशयित व साक्षीदारांचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. संदीप गावीत (परिमंडळ) व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस उपनिरीक्षक विजय देवराम पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हवालदार अकरम शेख, किशोर पाटील, प्रवीण भालेराव, मुरलीधर धनगर, पोलीस नाईक/कॉन्स्टेबल रवींद्र कापडणे, गोपाळ पाटील, प्रदीप सपकाळे, राहुल रगडे, छगन तायडे तसेच तांत्रिक विश्लेषणासाठी पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद जाधव व गौरव पाटील यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.







