शहादा ( विजय पाटील) कळंबू _ सारंखेडा परिसरातील उडीद व मूग पिकाचे अतिपावसामुळे अतोनात नुकसान झाले
असून शेतकरी हवालदिल झाला आहे.सदर नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
या परिसरात मागील पंधरा दिवसापासून सतत पावसाची रिपरिप सुरू असल्याकारणाने हातातोंडाशी आलेला मूग _उडीद अक्षरश: गळून पडला आहे. यामुळे परिसरातील शेतकरी हताश झालेले आहेत.
आधीच करोना संसर्गाच्या सावटामुळे संकटात सापडलेला शेतकरी वरुणराजाच्या आगमनाने उत्साहात होता परंतु अतिवृष्टीमुळे पावसाने पिकांना झोडपून काढले. मागील वर्षी देखील पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते त्याचे पंचनामे शासनाकडून करण्यात आले परंतु अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. तरी शासनाने शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे.कळंबू मंडळातील सारंखेडा ,कुकावल ,कोठली ,अनरद,पुसनद या परिसरातील पिकांचे नुकसान झालेले आहे.







