- वाहन विक्रेत्यांचे आरटीओत रॅकेट
- जळगावच्या व्यक्तीची बनावट कागदपत्रांआधारे पुण्यातून दुचाकी खरेदी
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – परजिल्ह्यातील ग्राहकांना वाहन विक्री करण्यासाठी बनावट भाडेकराराचा वापर होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुण्यात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. यामुळे प्रादेशिक परिवहन विभागातील भोंगळ कारभारामुळे अशी अनेक वाहने नोंदली गेली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या वाहनांचा वापर गुन्हेगारांकडून होण्याची शक्यता असूनही परिवहन विभाग मात्र या घटनांकडे डोळेझाक करीत असून, त्यावर कोणतीही कारवाई करीत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. एखाद्या गुन्ह्यात वापरलेल्या वाहनावरून पोलीस अनेकदा आरोपीचा माग काढतात मात्र अशा बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदविलेल्या वाहन मालकाचा माग काढायचा कसा? असा सवालही उपस्थित होत आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, बनावट भाडेकरार दाखवून नवी दुचाकी पुणे येथे रजिस्टर करण्यात आली. दिलेल्या पत्त्यावर आरटीओकडून कागदपत्र पाठविल्यावर सात महिन्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. जळगावातील घर नं. ९, कंवरनगर, सिंधी कॉलनी येथील राहिवासी असणाऱ्या पवन नंदलाल वर्याणी याने पुणे येथील घर नं. ५०१, गुलमोहन रॉयल को.ऑप हौसिंग सोसायटी, विमाननगर, पुणे हा पत्ता दाखविण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून पुण्यात नवी दुचाकी खरेदी केली. मात्र त्या ठिकाणी पवन नंदलाल राहतच नाही. मात्र आरटीओने या पत्त्यावर कागदपत्र पाठविल्यानंतर या फ्लॅटच्या व्यवहारासंबंधात जबाबदार असणाऱ्या ज्वेल मॉरिस पॉल (वय ३८, रा.विमाननगर) यांना बनावट कागदपत्रे बनविल्याचे लक्षात आले. पॉल यांनी पुणे आरटीओत चौकशी केल्यानंतर, बनावट भाडेकरार बनविल्याचे उघड झाले. त्यांनी तातडीने विमाननगर पोलीसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव गिरी करीत आहेत.
बनावट दस्तावर वाहन नोंदणी होण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी दोषी आहेत तेवढेच किंबहुना अधिक प्रमाणात वाहन विक्रेते आणि त्यांचे आरटीओमधील दलाल अधिक दोषी आहेत. वाहन विक्री शोमरुम चालकांकडून ऑनलाइन किंवा प्रत्यक्षात जमा करण्यात येणारी कागदपत्रे गांभीर्याने पडताळली जात नसल्याने गुन्हेगारांना याचा फायदा होत आहे. नवीन व जुन्या वाहनाची खरेदी विक्री करताना प्रादेशिक परिवहन कार्यालयात राहिवासाचा पुरावा जोडावा लागतो. भाडेकरु असेल तर त्याला भाडेकरार व मूळ मालकाच्या घराचे वीज बिल जोडावे लागते. सारथी पोट४लवर कागदपत्रे स्कॅन करून जोडल्यावर प्रत्यक्षात प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊनही त्याची प्रत द्यावी लागते. या मूळ कागदपत्रांची पडताळणी करणे ही प्रादेशिक परिवहन कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी असते. मात्र येथेच ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. वाहन विक्रेते आणि दलालांमार्फत आलेल्या कागदपत्रांची पडताळणी न करताच झटपट कार्यवाही करण्याला प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आहे.







