शहादा ( विजय पाटील) – कोरोनाच्या प्रादुर्भावाने सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रतिबंध करण्यात आले असल्याने गणेश
मंडळांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास व मिरवणूक काढण्यास मर्यादा आल्या असल्यातरी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील श्री रामराम गणेश मित्र मंडळाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून कोविड19 च्या रुग्णांना रक्त उपलब्ध करून देऊन सामाजिक बंधिलकी जोपासली आहे.
शहादा येथील या गणेश मंडळाची सुंदर गणेश मूर्ती, प्रबोधनपर सुंदर आरास, सांस्कृतिक कार्यक्रम व आदर्श विसर्जन मिरवणूक काढण्याची परंपरा राहिली आहे. या वर्षी मात्र मंडळाला कोणतेही उपक्रम राबवितां आलेले नसल्याने घरात मूर्तीची स्थापना करून गणेशोत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे. सामाजिक
उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येथे रक्तदान तर केलेच इतर रक्तदात्यांचाही चांगला प्रतिसाद लाभला. संकलित झालेले रक्त कोविड19 च्या रुग्णांसाठी रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तपेढीत देण्यात आले. रक्तदात्यांना मांडळा कडून पदाधिकारींचे हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तुंचेही वितरण करण्यात आले.
गणेशोत्सवात मानवतेचे भान ठेवणाऱ्या शहाद्यातील श्री रामराम गणेश मित्र मंडळाचा हा उपक्रम अनुकरणीय ठरला असून मंडळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.








