मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी बिहारमध्ये दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीनंतर चित्रपट निर्माते, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या कार्यालयाकडून एक मेसेज देण्यात आला आहे की, सुशांत सिंह राजपूतला एक किंवा दोन वेळा नाही तर तब्बल चार वेळा चित्रपटांची ऑफर देण्यात आली होती.
बिहारच्या एका वकिलाने सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी फौजदारी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत करण जोहर, संजय लीला भन्साळी, एकता कपूर, अभिनेता सलमान खानसह आठ जणांविरोधात तक्रार देण्यात आली आहे. संजय लीला भन्साळी यांच्या कार्यालयाकडून एक मेसेज जारी करण्यात आला की, सुशांतच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करत असलेल्या लोकांना माहिती नाही की, सुशांत आणि संजय लीला भन्साळी यांची चांगली मैत्री होती. त्यांना एकमेकांचे कामदेखील आवडायचे. केवळ एक किंवा दोन वेळा नाही तर ४ वेळा दोघांना एकत्र काम करण्याची संधी आली होती. परंतु, तारीख उपलब्ध न झाल्याने चित्रपटांबाबत बोलणं पुढे जाऊ शकलं नाही.






