शिरपूर येथे कोट्यावधीचा गांजा जप्त

शिरपूर – तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखा व शिरपूर तालुका पोलीस स्टेशनने केलेल्या संयुक्त कारवाईत शेतातील गंजीत लपविलेल्या कोट्यावधीचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील लकड्या हनुमान गावातील मांगीलाल बारकू पावरा याने त्याच्या शेतातील कडब्याच्या गंजीत बेकायदेशीर विक्री करण्याकरिता सुका गांजा लपवून ठेवल्याची माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने धुळे स्थानिक गुन्हे शाखेने छाप्याचे नियोजन करुन शिरपूर तालुका पोलिसांच्या सहकार्याने १६ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास लकड्या हनुमान गावाचे शिवारातील मांगीलाल पावरा यांच्या शेतात चापा टाकला असा, कडब्याच्या गंजीत २ कोटी १४ लाख ७३ हजार रुपये किंमतीचा हिरवट रंगाचा ३,९०४ किलोग्रॅम गांजा सदृष्य पदार्थ, २५ हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची मोटार सायकल (क्रमांक एम.पी.४६ – एम.एन.९०६२), ३ हजार रुपये किंमतीचा तराजू काटा व १० किलोचे वजन असा एकूण २ कोटी १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान पोलिसांची चाहुल लागताच मांगीलाल पावरा फरार झाला असून, ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवाजी बुधवंत, सपोनि उमेश बोरसे, पोसई अनिल पाटील, हे.काँ. सुनिल विचुंरकर, महेंद्र कापूरे, पो.कॉ. चेतन कंखरे, मनोज पाटील, योगेश जगताप, विजय सोनवणे, सागर शिर्के व शिरपूर पोलिस स्टेशनचे सपोनि अभिषेक पाटील, पोसई दिपक वारे, नरेंद्र खैरनार, हे.कॉ. सुनिल मोरे, पो.ना.संतोष देवरे, कुंदन पवार, आरीफ पठाण यांनी कारवाई केली. यावेळी नायब तहसीलदार सुदाम चौरे, लघुन्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेचे प्रविण मोरे व सहकारी उपस्थित होते. स्था.गु.शा.चे सपोनि उमेश बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शिरपूर तालुका पोलीस स्टेशनला गुरनं४३/२०२०, एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम २० व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here