शहादा (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या काकडदा येथील डोंगरांवर
तब्बल सोळा हजार केशर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. सातपुड्यातील डोंगरदऱ्यांमधील शेतकऱ्यांना फळझाडे लागवडीसाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून प्रोत्साहित करण्यात आले.कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या अनुदान व योजना संबंधी ची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम येथील कृषी सहाय्यक आर.एम. पाडवी यांनी पार पाडले.
डोंगर-दर्यांमधे राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायातीलआव्हानांना जाणून घेत यातून मार्गक्रमण करणे गरजेचे होते म्हणून पाडवी यांनी फळझाडे लागवडीचा पर्याय शेतकऱ्यांसमोर ठेवला. सुरुवातीला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडून शेतं तळ्यांची मंजुरी मिळवून मोठमोठे शेततळ्यांची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली.शेततळ्यांच्या माध्यमातून “वाटर बँक “निर्मितीचे कार्य प्रथमता पूर्ण
करण्यात आले. 2015 पासून या भागातील शेतकरी फळझाडे लागवडीसाठी पुढे आले. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी फळझाडांची व्यवस्थित नियोजन करून लागवड करण्यात आली.या परिसरात विविध फळझाडांची लागवड करण्यात आली आहे जसे आंबे ,लिंबू ,चिकू ,पेरू, सिताफळ इ. सध्या येथील केशर आंबे प्रसिद्ध असून केशर आंब्यासाठी हा परिसर प्रसिद्ध झाला आहे. थोडीथोडकी नव्हे तर तब्बल 16 हजार च्या वर केशर आंब्याची लागवड या परिसरात करण्यात आली आहे. 7 हजार पेरूच्या झाडांचीही लागवड या परिसरात करण्यात आली आहे. सातपुड्यातील ” मेंगो फ्रुट बाऊल “म्हणून या परिसराची नवीन ओळख निर्माण झाली आहे.कृषी पर्यटनासाठी शेतकरी या ठिकाणी येतात आणि फळझाडे लागवडीसाठी मार्गदर्शन व माहिती घेतात. आदिवासी भागातील फळझाडांचे हे नंदनवन शेतकऱ्यांनी पहावे व फळझाडे लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.







