लंडन – मुलांमध्ये उलटी, जुलाब व पोटात मुरडा येणे ही कोरोना संक्रमणाची लक्षणे असू शकतात असा दावा बिटिश संशोधकांनी केला आहे. बेलफास्टच्या क्वीन्स युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. कोरोनाच्या लक्षणांमध्ये या गोष्टींचाही समावेश केला जावा, असे त्यांनी म्हटले आहे.
सध्या कोरोना संक्रमणाची ताप, खोकला आणि चव-गंध न कळणे ही तीन प्रमुख लक्षणे मानली जातात. यापैकी कोणतेही लक्षण असले तरी आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला जातो व त्यांची टेस्ट घेतली जाते. मात्र, आता मुलांबाबत बि—टिश संशोधकांनी केलेल्या या संशोधनानुसार लक्षणांमध्ये आणखी वाढ होऊ शकते. या पाहणीत सुमारे एक हजार मुलांना सहभागी करून घेण्यात आले. ‘मेडरेक्सी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या या पाहणीनुसार 992 मुलांपैकी 68 जणांच्या शरीरात विषाणूच्या अँटिबॉडीज दिसून आल्या. त्यापैकी निम्म्या मुलांमध्ये ‘कोव्हिड-19’ची सर्वसामान्य लक्षणेही दिसून आली; पण त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची वेळ आली नाही. संशोधक डॉ. टॉम वॉटरफील्ड यांनी सांगितले, या विषाणूमुळे मुलं आजारी पडली नाहीत ही सुदैवाची बाब आहे. मात्र, त्यांच्यामधून किती मुलांमध्ये हा विषाणू फैलावला हे सांगता येत नाही. आमच्या पाहणीत जुलाब आणि उलट्यांचेही लक्षण दिसून आले. अधिकृत लक्षणांमध्ये त्यांना समाविष्ट करण्याबाबत आम्ही विचार करीत आहोत. अमेरिकन सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलने ‘कोव्हिड-19’ च्या संभाव्य लक्षणांमध्ये उलट्या-जुलाब यांचाही समावेश केला आहे.







