‘अवलिया पत्रकार ‘ : कांतीलाल कडू

– उमा जंगम (ज्येष्ठ पत्रकार, रायगड-मुंबई)
काही माणसे अशी असतात जी बोलतात कमी आणि आधी कृती करतात. ‘आधी केले मग सांगितले’ किंबहुना त्यांनी केलेले काम वार्‍यासारखे सर्वत्र पसरते! असाच एक ‘अवलिया पत्रकार’ नुकताच आमच्या पाहण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ‘निर्भिड लेख’ या दैनिकाचा पनवेल तालुक्यातील हा स्वतंत्र बाण्याचा, सडेतोड बोलणारा पत्रकार. असेल 48 वयाचा. त्यातली पत्रकारितेत 29 वर्षे. या अवलियाचे नाव आहे कांतीलाल कडू! नावाप्रमाणेच वागणारा. त्यांच्या ‘कडू डोसा’मुळे भले-भले भ्रष्टाचारी सरळ झाले. आज जिल्ह्यात कडूंचा दबदबा सर्वत्र ऐकावयास मिळत आहे. ‘जे कुणी रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची पत्रकार ओळखावा’ अशी नवीन म्हण आम्ही तयार केली आहे. ही म्हण ‘कांतीलाल कडूंं’ना चपलख बसते! याची प्रचिती आम्हाला आली; म्हणून हा पंक्तिप्रंपच!
देशात कोरोनाचे थैमान चालूच आहे. रंकापासून ते राजापर्यंत कुणालाही या कोरोनाने सोडलेले नाही. मात्र, गरिबांना या कोरोनाने वेठीस धरले. जिकडे-तिकडे स्मशानशांतता! सगळी रुग्णालये तुंडूब भरलेली. शासनाच्या रुग्णालयांबद्दल न बोललेलेच बरे! खासगी रुग्णालये फक्त श्रीमंतांच्याच सेवेसाठी कार्यरत. रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी नातेवाईक वेळप्रसंगी दागिने गहाण ठेवून हव्या तेवढ्या व्याजाने पैसे काढून रुग्णाला खासगी रूग्णालयामध्ये दाखल करीत आहेत. अशावेळी या खासगी रुग्णालयवाल्यांनी रुग्णाच्या नातेवाईकांना हवे तसे (पैसांना) कापले. लाख-लाख रूपयांचे बील करुन त्यांना लुबाडले! इतकेच काय, रुग्णाचा मृत्यु जरी झाला तरी त्या डॉक्टरांना दया-माया येत नाही. आधी 3/4 लाखांचे बील पेड करा मगच मृतदेह ताब्यात देऊ किंवा मृत्युचा दाखला दिला जाईल, असे डॉक्टर नातेवाईकांना धमकी देऊन सांगत होते. सगळेच डॉक्टर भ्रष्टाचारी होते असे नव्हे पण जे कुणी होते; त्यांना या अवलिया पत्रकाराने चांगलाच धडा शिकवला. रुग्णांचे नातेवाईक कांतीलाल कडू यांच्याकडे आपले गार्‍हाणे (पुराव्यासह) घेऊन आल्यावर कांतीलाल कडू त्यांची सगळी कहाणी ऐकून घेतात, मग लगेच ‘पायताण’ घालून सगळा लवाजमा त्या रुग्णालयात दाखल होतो. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांना भेटून सगळी वस्तुस्थिती तपासली जाते अगदी शांतपणे. अर्थातच कांतीलाल कडू यांची छाप, करारी बोलणे यामुळे डॉक्टर आधीच गर्भगळीत होतात. कडूंचे बोलणे कायद्याला धरून, त्यामुळे डॉक्टरला ‘पळवाट’ काढताच येत नाही. अशा पनवेल आणि शेजारील शहारांमधील बर्‍याच रुग्णालयात या घटना घडून आल्या. अनेक गोरगरीब या ‘अवलियाला’ दुवा देत आहेत. न्यायाची कास धरुन अन्यायावर मात करणारा हा पत्रकार म्हणून आज जिल्ह्यात गाजू लागला आहे. या अवलिया पत्रकाराचे अभिनंदन…!
स्वातंत्र्यपूर्व भारतात मोठ-मोठे पत्रकार झाले होते. त्या सर्वांनी आपल्या लेखणीबरोबर आपले शरीरही झिजविले! लोकमान्य टिळक, आगरकर, बाळशास्त्री जांभेकर, महात्मा फुले, परांजपे यासारख्या मोठ-मोठ्या विभूतींनी आपला देह कष्टविला. अनेक यातना सहन केल्या. त्यावेळची पत्रकारिता इंग्रजी राजवटीतील सरकारी पैसा (जाहिराती) मिळणे तर दूरच! मान-मरातब दूरच! जनतेचा आर्थिक पाठिंबा नाही पण जागृती करण्यासाठी इंग्रजी राजवट उलथून टाकण्यासाठी वरील पत्रकारांनी आपल्या घरावर ‘तुळशीपत्र’ ठेवून पत्रकारिता केली; म्हणूनच आज आपण स्वातंत्र्याची ‘गोड फळं’ चाखत आहोत. (आणि काही नेते आपली घरे भरत आहेत.) मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे त्यावेळची ‘पत्रकारिता विकावू,, नव्हती. इंग्रजही ‘चळचळा’ कापत होते. लोकमान्य टिळकांनी आपल्या अग्रलेखातून ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय’ असा सवाल त्यांना केला होता! त्यांचे ते ‘धाडस’ आजचे पत्रकार करतील काय? आज बहुतेक बडे पेपरवाले ‘पीत पत्रकारिता’ करीत आहेत. काही नेत्यांनी आपल्या दावणीला असे पत्रकार बांधूनच घेतलेले आहेत. त्यात आता ‘सोशल मिडियाचा’ सुळसळाट झाला आहे.
असो; पण आजही काही ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागात लोकमान्य टिळकांची औलादी दिसून येत आहेत. त्यांची ‘वाहवा-वाहवा’ होतही आहे. पण आजकाल ‘राजकीय हस्तक्षेप’ खुप होऊ लागला आहे. तोही ‘छुपा-छुपा’ हे सांगण्यास खंत वाटते; त्यावेळची राजवट परक्यांची होती. आज आपलेच काही नेते खर्‍या पत्रकारितेचा गळा घोटत आहेत. अशावेळेला कांतीलाल कडूंसारख्या निर्भीड पत्रकारावर फार मोठी जबाबदारी आहे. त्यांच्याकडून जनता चांगल्या गोष्टींची अपेक्षा करीतच आहे! त्यांनी जनतेला न्याय देण्याचा वसा घेतलाच आहे. पत्रकारांनी जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना न्याय मिळवून द्यावा. बरेच पत्रकार हुशार आहेत, पण दबावाला बळी पडतात. त्यांना कडू यांनी एकत्र आणले पाहिजे. ‘एकीचे बळ’ सर्वांनाच ठाऊक आहे. रायगड हा मूठभर पराक्रमाचा ‘मानबिंदू’ आहे. इथल्या मूठभर मावळ्यांनी इतिहास घडविला आहे. कांतीलाल कडू तुमच्यासारखे तळमळीने लेखणी उगारणारे पत्रकार आज महाराष्ट्राला हवे आहेत. घेतला वसा टाकू नका; उतू नका, मातू नका..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here