‘आर टी ई’ प्रवेश निश्चिती अंतिम दिनांकास १५ सप्‍टेंबर पर्यंत मुदतवाढ

  • १५ सप्‍टेंबर २०२० पर्यंत कागदपत्रे शाळेस पाठविणे आवश्‍यक
  • ‘कोविड-१९’ च्‍या पार्श्‍वभूमीवर इ-मेल/व्‍हॉटसऍपव्‍दारे कागदपत्रे सादर करता येणार

मुंबई (उपसंपादक जगदीश सोलंकी) – ‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ (आर टी ई) नुसार खाजगी विना-अनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. दरवर्षीप्रमाणे सन २०२०-२१ यावर्षासाठी ‘आर टी ई’ अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून यापूर्वीच म्‍हणजे दि. १७.०३.२०२० रोजी लॉटरी काढण्यात आली आहे. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील लॉटरीद्वारे निवड झालेल्‍या व त्यानुसार प्रवेश दिलेल्या बालकांची माहिती पुढीलप्रमाणे आहे : (Please check email or pdf file for this information)
सदर सोडतीत निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी दि. ३१ ऑगस्‍ट २०२० पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावायाचा होता. तथापि, यास आता १५ सप्‍टेंबर २०२० पर्यंत मुदतवाढ देण्‍यात आली आहे, याची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्‍यावी. तसेच लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास दिनांक १५ सप्‍टेंबर २०२० नंतर प्रवेश दिला जाणार नाही, याचीही कृपया नोंद घ्यावी. तसेच नॉव्हेल करोना विषाणूचा (कोविड-१९) प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये, असेही आवाहन करण्‍यात येत आहे.
ज्या बालकांना लॉटरी लागली आहे. त्यांच्या पालकांनी मूळ कागदपत्रे व छायांकित प्रती घेऊन ज्या शाळेसाठी बालकाची निवड झाली आहे. त्या शाळेत दि. १५ सप्‍टेंबर २०२० रोजी किंवा त्‍यापूर्वी जाऊन तातडीने आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा. शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करणे शक्य नसल्यास इ-मेल / व्‍हॉटसऍपद्वारे कागदपत्रांच्‍या प्रती शाळेस पाठविण्‍याची सुविधा संबंधित शाळांद्वारे उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. यानुसार कागदपत्रे पाठविल्‍यानंतर दूरध्वनीद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करून पालकांनी प्रवेश निश्चित करावा.
तसेच शाळांनी देखील प्राथमिक स्तरावर दिलेल्या प्रवेशाची कागदपत्रे पडताळणी समितीला दाखवून पडताळ्णी करुन प्रवेश अंतिम करावेत. प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांची यादी ‘आरटीई पोर्टल’वर प्राप्त झाली आहे. त्या यादीतील अद्याप प्रवेशासाठी शाळेत न आलेल्या बालकांच्या पालकांना दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क करून त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही दि. १५ सप्‍टेंबर २०२० पूर्वी पूर्ण करावयाची आहे. तरी सर्व संबंधित पालकांनी याची नोंद घेऊन दि. १५ सप्‍टेंबर २०२० पूर्वी शाळा-प्रवेश निश्चिती करावी, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या शिक्षण खात्‍याव्‍दारे करण्‍यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here