जळगाव (विशेष प्रतिनिधी) – मराठवाडा, कोकणातून प्रत्येकी तीन मुख्यमंत्री झाले. मात्र उत्तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्री होऊ दिला नाही. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आला, त्याला बाजूला सारले गेले अशी खंत, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली. त्याचवेळी मला उध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्यामुळे त्रास झाला. मला जो त्रास झाला तो फक्त फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो, असे जाहीर वक्तव्य खडसे यांनी केले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.
खडसे पुढे म्हणालेत, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ड्राय क्लिनर होते. आरोप झालेल्या प्रत्येकाला त्यांनी क्लीन चिट दिली. पण नाथाभाऊला मात्र त्यांनी क्लीन चीट दिली नाही, अशी व्यथाही खडसे यांनी यावेळी बोलून दाखवली. जळगावातल्या मुक्ताईनगरमध्ये ‘जनसेवेचा मानबिंदू एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमावेळी खडसेंनी आपले मनोगत मांडले. त्यावेळी फडणवीस यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले.
नाथाभाऊ पक्ष का सोडत नाही, असे कार्यकर्ते विचारतात. नाथाभाऊने काही काळबेरं केलं म्हणून नाथाभाऊ पक्ष सोडत नाही का, असं काहीही नसून अनेक पक्षातून आजही ऑफर आहे. महाराष्ट्रातील जनतेला विचारून लवकरच निर्णय घेईल, असा थेट इशारा त्यांनी पक्षाला दिला आहे.
दरम्यान, मला जो त्रास झाला, तो फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे म्हणून त्यांचे नाव घेतो. मला उध्वस्त करण्याचे काम केले. मला पक्षाचा कधी विरोध झाला नाही तर व्यक्तीने केला. माझी ताकद माझा कार्यकर्ता, माझी जनता, असे सांगत नव्या वाटचालीबाबत सांगताना त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत.
प्रा.डॉ.सुनिल नेवे लिखित ‘जनसेवेचा मानबिंदू – एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचे प्रकाशन मुक्ताईनगर येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, रावसाहेबजी दानवे आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार ,माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊजी बागडे यांच्या हस्ते पुस्तकाचे ऑनलाइन प्रकाशन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमास जिल्हा दुध संघाच्या अध्यक्षा मंदाताई खडसे, खासदार रक्षाताई खडसे, जि प अध्यक्षा रंजनताई पाटील,आमदार संजयजी सावकारे, आमदार सुरेशजी भोळे (राजुमामा), विधानपरिषदेचे माजी आमदार डॉ. गुरुमुखजीजगवानी,माजी.आ.चैनसुख संचेती महामंडलेश्वर सद्गुरू जनार्दन हरीजी महाराज, सद्गुरू शास्त्री भक्तीप्रकाश दासजी, सद्गुरू महंत प्रभाकर शास्त्रीजी, जिल्हा बँक अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर,जि प उपाध्यक्ष लालचंदभाऊ पाटील, जि प सभापती जयपालभाऊ बोदडे, रवींद्रजी पाटील,साहित्यिक व पु होले, सावदा नगराध्यक्षा अनिता ताई येवले, मुक्ताईनगर नगराध्यक्षा नजमाताई तडवी ,मुक्ताईनगर प स सभापती विद्याताई पाटील, बोदवड प स सभापती किशोर गायकवाड, रावेर प स सभापती जितू पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.







