सातारा (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – कोरेगाव तालुक्यातील श्री जरंडेश्वर देवस्थान डोंगर परिसरात वादळी वा-यासह ढगफुटीसदृश पाऊस झाला. ल्हासुर्णे येथे या पावसाचे पाणी ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी इमारतीसह अनेक घरात घुसले. ऊस भुईसपाट झाले असून अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले.
जरंडेश्वरच्या डोंगर परिसरात बुधवारी रात्री वादळी वार्यासह ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. दुपारपासूनच वातावरणात बदल झाला होता. आकाशात ढग दिसू लागले होते. दुपारनंतर ढगांनी आभाळ काळवंडून गेले होते. रात्री धुवाँधार पावसाला सुरूवात झाली. अनेक ठिकाणी रात्री 8 वाजल्यापासून कमी-जास्त पाऊस पडत होता. जरंडेश्वर देवस्थान डोंगर परिसरातील गावांमध्ये या पावसाने विध्वंसकारी रूप घेतले. बघता बघता पावसाची तीव्रता वाढत गेली. ढगफुटी सदृश पावसाने परिसराला भेदरवून टाकले.
त्यामुळे जांब बु., भाकरवाडी शिवारातून वाहत असलेल्या करंज ओढ्यास पूर आला. या पुराचे पाणी वाट मिळेल तिकडे वाहत होते.वसना नदी पात्राच्या अलीकडे ल्हासुर्णे गावातील ग्रामपंचायत कार्यालयात व अंगणवाडी इमारतीत घुसले. या पाण्याने अनेक घरातही शिरकाव केला. त्यामुळे मोठे नुकसान झाले. नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य भिजल्याने मोठी आर्थिक हानी झाली. हातातोंडाला आलेल्या कडधान्याच्या पिकासह ऊसपीक भुईसपाट होवून मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता कहर व निसर्गाच्या अवकृपेत भरडलेला बळीराजा हवालदिल झाला आहे.







