जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून १५ सप्टेंबरपासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियानाचा शुभारंभ करण्यात येत आहे.
या अभियानाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून १२ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान जळगाव जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्तींचे सखोल आरोग्य सर्वेक्षण करण्यात येणार आहे. आरोग्य सर्वेक्षणासाठी ग्रामीण भागात गाव पातळीवर व नागरी भागात प्रभाग पातळीवर सर्वेक्षण पथके नियुक्त करण्यात आलेली आहेत. या पथकांमध्ये शासनाच्या विविध विभागांचे कर्मचारी व सामाजिक संस्थांचे सदस्यांच्या समावेश आहे. ही पथके घरोघरी भेट देवून ५० पेक्ष जास्त वय असलेल्या व्यक्तींची प्राथमिक आरोग्य तपासणी करणार आहेत.
कोरोना या साथरोगाचे निदान लवकर झाल्यास रुग्ण केवळ औषधोपचारांनी बरा होतो. जिल्ह्यात सद्यस्थितीत २५ हजार ८४६ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत परंतु लक्षणांकडे व आजारांकडे दुर्लक्ष केल्यास रोग बळावतो व रुग्ण गंभीर अवस्थेत जावून दगावण्याची शक्यता अधिक असते.
आपल्या घरी भेट देणाऱ्या पथकांना सहकार्य करून, त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांची परिपूर्ण माहिती द्यावी व आपल्या कुटुंबाचा कोरोना या साथरोगापासून बचाव करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.








