नवी दिल्ली – आर्य समाजाचे प्रख्यात नेते स्वामी अग्निवेश यांचे निधन झाले. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आर्य समाज नेते स्वामी अग्निवेश यांना दिल्लीतील आयएलबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अवयव निकामी झाल्याने ते मंगळवारपासून व्हेंटिलेटरवर होते.
यकृताच्या कर्करोगाने ग्रस्त झालेल्या स्वामी अग्निवेश यांच्या अनेक अवयवांनी काम करणे थांबवले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र त्यांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश येऊ शकले नाही.
सामाजिक मुद्यावर खुलेपणाने आपले मत मांडणारे स्वामी अग्निवेश यांनी १९७० मध्ये आर्यसभा नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. १९७७ मध्ये ते हरियाणा विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले आणि त्यांनी हरियाणा सरकारमध्ये शिक्षणमंत्री म्हणूनही काम पाहिले.
१९८१ मध्ये त्यांनी बंधू मुक्ती मोर्चा नावाची संस्था स्थापन केली. स्वामी अग्निवेश यांनी २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वात भ्रष्टाचारविरोधी चळवळीतही भाग घेतला. तथापि, नंतर मतभेदांमुळे त्यांनी या आंदोलनातून माघार घेतली. बिग बॉस या रिॲलिटी शोमध्येही स्वामी अग्निवेश यांनी भाग घेतला. ते ८ ते ११ नोव्हेंबर या काळात बिग बॉसच्या घरात तीन दिवस राहिले.







