झांबिया (दक्षिण आफ्रिका) – दक्षिण आफ्रिकेतील झाम्बिया या ठिकाणी एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. इथे एका ४० वर्षीय महिलेने आपल्या ५२ वर्षीय पतीच्या गुप्तांगाला चावा घेऊन त्याला गंभीररित्या जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. असं घडण्यामागे फार काही मोठं कारण नाही. एका क्षुल्लक कारणावरुन पती आणि पत्नीमध्ये झालेल्या वादातून ही भयंकर घटना घडली आहे. त्याचं झालं असं की, पत्नीने पतीला बेडरूममध्ये घुसलेला उंदीर बाहेर काढण्यास नकार दिल्यानंतर चिडलेल्या पत्नीने थेट पतीवरच विचित्र पद्धतीने हल्ला चढवला. ही संपूर्ण घटना झांबियाच्या किटवे शहरात घडली आहे.
याबाबत वृत्तसंस्थेकडून समजलेली माहिती अशी की, पतीवर हल्ला करणारी पत्नी ही आपल्या मित्रांसोबत मद्यपान करुन घरी आली होती. जेव्हा महिला आपल्या बेडरुमध्ये आली तेव्हा तिला तिथे उंदीर घुसल्याचं दिसलं. त्यामुळे ती खूपच घाबरली. त्यानंतरही तिने बेडरुममध्येच झोपण्याचा प्रयत्न केला. पण उंदीर सतत इकडून तिकडे करत असल्याने महिलेला झोप लागत नव्हती. या सगळ्या प्रकाराने ती खूपच संतापली आणि त्यामुळेच तिने आपल्या पतीला झोपेतून उठवून त्या उंदराला बेडरुममधून बाहेर काढण्यास सांगितलं. पत्नीने असं सांगितल्यानंतरही पतीने उंदीर रुमबाहेर काढण्यास नकार दिला.
पत्नीने सांगितलेली गोष्ट पतीने नाकारल्यानंतर पत्नीचा पारा खूपच चढला आणि तिने आपल्या पतीसोबत जोरदार भांडण सुरु केलं. दोघांमधील वाद प्रचंड टोकाला पोहचला. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने थेट आपल्या दाताने पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला. तिने केलेला हा हल्ला प्रचंड अनपेक्षित होता. पत्नीने केलेल्या हल्ल्यात पती गंभीररित्या जखमी झाला असल्याचं समजतं आहे. यामुळे उपचारासाठी पतीला रुग्णालयात दाखल करावं लागलं. मात्र असं असलं तरीही पतीने आपल्या पत्नीविरुद्ध पोलिसात कोणतीही तक्रार केलेली नाही.
दरम्यान, उपचारानंतर पती घरी परतला असून आता दोघेही आपल्याच घरात वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.







