निवृत्त नौदल अधिकारी मारहाण प्रकरणी मुंबईत भाजपचं ठिय्या आंदोलन

मुंबई (हितेश मिस्त्री) – निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांना अवघ्या काही तासांतच जामीन मिळाला. यामुळे भारतीय जनता पक्षाने आक्रमक होत ठिय्या आंदोलन केलं. राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील पोलीस सहआयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात पीडित निवृत्त नौदल अधिकाऱ्यांची मुलगीही सहभागी झाली होती.
निवृत्त नौदल अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत पीडित निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत शिवसैनिकांना अटक केली. मात्र, त्यांच्यावर लावण्यात आलेली कलमं ही जामीनपात्र असल्याने त्यांना तात्काळ जामीन मिळाला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींच्या विरोधात अजामीनपात्र कलमं लावावी अशी मागणी भाजपने केली आहे.
आरोपींविरोधात अजामीनपात्र कलमे लावण्यात येऊन कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाईचं आश्वासन दिल्याने ठिय्या आंदोलन मागे घेत आहोत मात्र, जर पोलिसांनी आश्वासन पाळलं नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असंही भाजपने म्हटलं आहे.
भाजपने ठिय्या आंदोलन सुरू केल्याने सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, आरोपींवर नियमांनुसार कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिसांवर कोणताही दबाव नाहीये आणि कलमं लावण्यासंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन आम्ही घेत आहोत आणि त्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
निवृत्त नौदल अधिकाऱ्याचं देशासाठी एक खास योगदान आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमीच सैनिकांचा सन्मान केला. पण आता सत्तेच्या नादात शिवसेना आपली भूमिका विसरत गुंडाराज आपल्याला दिसत आहे. पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटत आहे. मारहाणीत पीडित अधिकाऱ्याला गंभीर जखम झाली आहे. याचं सीसीटीव्ही फुटेज असतानाही आरोपींना जामीन कसा मिळतो असा प्रश्न प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here