पुण्यात भेसळयुक्त तुपाच्या कारखान्यावर छापा

पुणे (प्रतिनिधी सुनिल बोसले) – गुन्हे शाखेच्या खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत वडगाव शेरी परिसरात भेसळयुक्त तुपाच्या दोन कारखान्यावर छापा टाकला. या कारवाईत साडेसातशे लिटर भेसळयुक्त तूप, कच्चा माल आणि साधनसामग्री असा सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी साहिल मेहंदी भानोडिया आणि दिनेश मेहंदी भानोडिया (दोघे रा. मूळ उत्तरप्रदेश) या भावांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वडगाव शेरी परिसरात भेसळयुक्त तूप तयार केले जात आहे. ते तूप दोन्ही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणी विकत आहे, अशी माहिती खबरीकडून गुन्हे शाखेस मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी अन्न व पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधला.
अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपायुक्त गुन्हे बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी आणि अमली पदार्थ विरोधी पथकाचे (पश्‍चिम) वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते, पोलिस उपनिरीक्षक महाडीक कर्मचारी मनोज शिंदे, महेश कदम, फिरोज बागवान, मंगेश पवार, प्रमोद टिळेकर, अमोल पिलाणे, साहिल शेख, प्रदीप गाडे, रूपाली कर्णवर यांचे पथक आणि एफडीएचे अधिकारी यांनी संबंधित गोडाऊनवर छापा टाकला.
दोघे आरोपी मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. गेल्या वर्षापासून ते तुपाचे उत्पादन करीत होते. त्यांच्याकडे एफडीएचा परवाना नाही. ज्या ठिकाणी ते उत्पादन करीत होते, तेथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होती. तेथील भांड्यात उंदीर आढळून आले आहेत. पुढील कारवाई अन्न व पुरवठा अधिकारी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here