अलिबाग-सोगावकर – राज्याचे पहिले निवडणूक आयुक्त, राज्याचे लँड लेझीसलेशनचे व लॉ कमिशन बोर्डाचे माजी चेअरमन डी.एन.चौधरी यांचे दि.३०/०८/२०२० रोजी वृद्धापकाळाने दुखद निधन झाले.
सर्व समाजामध्ये मानमरातब असलेले, लाघवी आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व आज काळाआड गेले आहे.मंत्रालयात ड्रॉफ्ट्समन या पदावर रुजू होवुन आपल्या कर्तबगारीने विधी व न्याय विभागाचे सचिव झाले.एक कर्तबगार सचिव म्हणून ते सर्व मुख्यमंत्र्यांचे आवडते होते.लोकांची कामे तत्परतेने व्हावीत यावर त्यांचा नेहमी कटाक्ष असे.

राज्याचे निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रत्येक राज्यात स्वतंत्र राज्य निवडणूक आयोगाच्या स्थापनेची तरतूद १९९२ मध्ये झालेल्या ७३ आणि ७४ व्या घटना दुरुस्ती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात १९९४ मध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. व चौधरी यांची पहिले राज्य निवडणूक आयुक्तपदी २६ एप्रिल १९९४ रोजी नियुक्ती झाली होती.
कृषी उत्पन्न बाजार समिती(ए. पी.एम.सी.)ऍक्ट राज्यातील शेतकरी बांधवांना फायदेशीर नाही याची त्यांना खंत होती. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने आयोजित कृषी,फलोत्पादन,मार्केटिंग, प्रक्रिया उद्योग परिषदांना,मेळाव्यांना ते अनेकदा संबोधित करून शेतकऱ्यांच्या व्यथा परखडपणे मांडीत असत. महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली आहे.
मृत्यूसमयी त्यांचे वय ९२ वर्षे होते. निवृत्ती नंतर ते त्यांचे पुत्र व अन्न व औषध प्रशासन विभागाचे माजी सह आयुक्त श्री. सुहास चौधरी यांचे सोबत मुंबईत राहत होते.








