तालाचे गणित समजून घ्यावे  : तालयोगी सुरेश तळवलकर 

अंकनाद आयोजित गणित आणि संगीत विषयावरील
सांगीतिक गणिती गप्पाचा समारोप

पुणे (प्रतिनिधी अविनाश मुंढे) – ‘ताल ही ठेक्याची पहिली बंदीश आहे . तबला वादनाच्या प्रत्येक प्रकारात हजारो बंदिशी आहेत ,विस्तार आहेत . या सगळ्यामागे तालाची भूमिका आहे . ठेक्याच्या रूपाने आपण आवर्तन प्रस्थापित करतो . त्यामागे सगळी गणिती भूमिका असते. हे गणित समजून घ्यायला हवे’ ,असे प्रतिपादन  तालयोगी सुरेश तळवलकर  यांनी केले .
‘गणित आणि संगीत’ या विषयावर ‘अंकनाद ‘ या अॅपतर्फे ११ सप्टेबर पासून ‘सांगीतिक गणिती गप्पा’ आयोजित करण्यात आल्या आहेत.१३  सप्टेंबर रोजी तालयोगी सुरेश तळवलकर   यांच्याशी प्राची साठे यांनी  संवाद साधला.
सुरेश तळवलकर म्हणाले ,’बुद्धी आणि शरीराची गरज भासत नाही अशा क्षणी नाद जन्माला येतो . तालक्रिया ही गणिती आहे. मात्रा ,ताल या सर्वामागे गणित आहे. ३६४ ताल उत्तर हिंदुस्थानी संगीतात मांडले गेले आहेत. कलाकार स्वतः काही ताल जन्माला घालतात . त्यात गणिती भूमिका अतिशय महत्वाची आहे. तालाच्या आत मात्रा आणि मात्रेच्या आत लघुमात्रा असा हा सांगीतिक प्रवास आहे . ठेक्याच्या रूपाने आपण आवर्तन प्रस्थापित करतो . त्यामागे सगळी गणिती भूमिका असते. पाढे म्हणताना नादरूपाने ते सोपे होतात ,हा नादाचा उपयोग आहे. शरीर ,बुद्धी ,मन आणि आत्मा तादात्म्य पावले की  संगीत तयार होते.
‘वाद्य शिकताना ,चाल लावताना गणिती अभ्यासाचा उपयोग होतो. संगीताच्या माध्यमातून बुद्धीचा गणितीय ठेवा निर्माण करणे शिकणे शक्य आहे, दैनंदिन अध्यापनात याचा समावेश करायला हवा. शिक्षकांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा.मुलांच्या मनात अंकांचे स्थान निर्माण झाले पाहिजे ‘,असे प्राची साठे यांनी सांगितले .
‘गणित आणि संगीत’ या विषयावर ‘अंकनाद ‘ या अॅपतर्फे ‘सांगीतिक गणिती गप्पा’ आयोजित करण्यात आल्या होत्या .११ ते १३ सप्टेबर दरम्यान सकाळी ११ वाजता वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते .११ सप्टेंबर रोजी चारुदत्त आफळे यांनी संवाद साधला. चारुदत्त आफळे यांच्यानंतर या वेबिनारमध्ये १२ सप्टेंबर रोजी संगीतकार अशोक पत्की,१३ सप्टेंबर रोजी तालयोगी सुरेश तळवलकर यांनी  मार्गदर्शन केले .
‘अंकनाद ‘ अॅपचे निर्माते मंदार नामजोशी यांनी उपक्रमांची माहिती दिली.’अंकनाद’ हे गणिताकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणारं  अॅप   आहे. रोजच्या जगण्यात गणिताला पर्याय नाही . गणित विषय रंजक करुन सांगण्याचे विविध उपक्रम ‘ अंकनाद ‘ तर्फे केले जातात,गणिताची आवड निर्माण केली जाते ,असे त्यांनी सांगितले.एकदा पाठ केलेले अंक नाद स्वरूपामुळे आयुष्यभर लक्षात राहतात. स्मरणशक्ती वाढते.
‘अंक नाद’चे संचालक पराग गाडगीळ यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर ,शिक्षक ,विद्यार्थी सहभागी झाले. निर्मिती नामजोशी यांनी प्रास्ताविक केले. 
या विषयावर पहिला वेबिनार  ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट रोजी झाला. त्यात “अनुभूती रिसर्च अँड फाऊंडेशन चे संस्थापक” प्रसाद मणेरीकर , बालभारती च्या बोर्ड ऑफ स्टडीज मेंबर प्राजक्ती गोखले , अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद  चे चेअरमन डॉ. अनिल सहस्रबुद्धे हे मान्यवर सहभागी झाले. या वेबिनारला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अंकनाद अॅपविषयी
दोन ते तीसचे पाढे घोकून पाठ करणं हे विद्यार्थ्यांना करावं लागतंच. पण या नव्या पिढीला पावकी, निमकी, पाऊणकी हे शब्दच माहीत नाहीत.  ही कोष्टकं म्हणजेच अपूर्णांकांचे पाढे पाठ केले, तर गणिताचा पाया पक्का होऊन जातो. ‘अंकनाद’ मध्ये पाढ्यांबरोबरच ही कोष्टकंसुद्धा साध्या सोप्या पद्धतीने शिकवली जातात.
गणित या विषयाची मुलांना एका नव्या, आकर्षक रुपात ओळख करून द्यावी आणि अवघड वाटणाऱ्या या विषयाशी सहजसोप्या रीतीने मैत्री व्हावी या उद्देशाने ‘अंकनाद’ ऍपची निर्मिती झाली. अल्पावधीतच मुलं आणि त्यांचे पालक यांनी या ऍपला भरघोस प्रतिसाद दिला.  विविध उपक्रम आणि कार्यशाळा यांच्या मार्फत  विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी सतत काही नवीन देता यावे हाच अंकनादचा प्रयत्न आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here