कांतीलाल कडू यांच्यामुळे जीव वाचला! – उत्तमराव गायकवाड

अलिबाग (राजेश बाष्टे) – देवाचे आशीर्वाद जरुर आहेत. परंतु मी मात्र म्हणेन, कांतीलाल कडूंच्या हिंमतबाजपणामुळे डॉक्टरांना नमते घ्यावे लागले. आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल, कामात अडथळा आणला म्हणून केस होईल का? सरकार कारवाई करेल, याची काहीही चिंता न करता, समाजासाठी आपले आयुष्य निःस्वार्थीपणे खर्च केले ते समाजभूषण उत्तमराव गायकवाड जगलेच पाहिजेत म्हणून कडू यांनी धारण केलेला तो रूद्रावतार आणि त्यांच्यामुळेच माझा जीव वाचू शकला, हे कधीही विसरू शकणार नाही.
मागच्या महिन्यातील 16 तारखेची घटना. रात्री 1 वाजता हॉटेल देवांशी कळंबोली येथे कोविड रुग्ण म्हणून दाखल झालो. परंतु, माझी हालत अत्यंत दयनिय होती. त्यात आभाळ फाटल्यागत धोधो पाऊस कोसळत होता. गाडीत पत्नी आणि मुलगा माझ्या सोबतीला होते. ऑक्सिजन 82 ते 88 दरम्यान… खोकल्याने कहर केलेला… कोविड सेंटरमध्ये बेड मिळावा म्हणून एमजीएम व डी. वाय पाटीलमध्ये शर्तीचे प्रयत्न सुरू होते. अगोदर देवांशीमध्ये माझी व्यवस्था नगरसेवक डॉ. अरुणशेठ भगत यांनी केली होती. परंतु तिथे मला ठेवणे धोकादायक होते असे तेथील डॉक्टरांनीच सांगितल्याने भीतीमध्ये भर पडली होती.
तेथील डॉक्टर आणि कर्मचारी प्रयत्न बेड उपलब्ध होईपर्यंत वाहनातच आँक्सिजन लावण्याची धडपड करत होते. परंतु दोन्ही रूग्णवाहिकेंपैंकी एकाही रूग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडर नव्हते तसेच दुसरी बंद अवस्थेत पडली होती. अशा कठिण परिस्थितीत डॉक्टर, मुलगा, पत्नी चिंतेत पडले होते. डॉ. भगतांचे प्रयत्न सुरू होते.
त्यात खोकला व दम लागत होता. शेवटी खारघरला खासगीत नेण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. तीही अधांतरीच…
इतक्यात नियती मदतीला धावली आणि मुलगा तुषारला, कांतीलाल कडूंची आठवण झाली…
त्याने मित्रांकडून मोबाईल नंबर मिळवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ…
मुलाने सहज विचारले, पप्पा कांतीलाल कडूंचा नंबर आहे काय? जोरात खोकत हो म्हणालो. मुलाचा विश्‍वास वाढला. घडलेला सर्व प्रकार कडूंना सांगितला.
कांतीलाल माझे मित्र आहेत, याची मुलाला व पत्नीला कल्पना नव्हती. माझा फोन म्हटल्यावर रात्री दोन वाजता कांतीलालने घेतला. मुलाने सगळी घटना सांगितली. त्यांनी ताबडतोब डी. वाय. पाटीलमधील डॉक्टरांना फोन केला. देवांशी येथील डॉक्टरांनाही कॉन्फरन्सवर घेतले… रात्रीच्या गर्भात हिर्‍यासारखा हा माझा मित्र चमकत होता…
कांतीलाल कडू बोलतोय… समाजभूषण उत्तमराव गायकवाड आजारी आहेत. काहीही करा. तात्काळ बेडची व्यवस्था करुन गायकवाड यांना सहकार्य करा. त्यांना या आजारातून वाचविले पाहिजेत. दूर्लक्ष केलात आणि काही अनर्थ झाल्यास तुम्ही जबाबदार असाल. शिवाय परिणामालाही सामोरे जावे लागेल. मी आता तात्काळ हॉस्पिटलला येतोय. असा दमच त्यांनी बेड नाही, म्हणणार्‍या डॉक्टरांना भरला.
सामाजिक भान जपत माणसं जगवली पाहिजेत. हे तर समाजभूषण आहेत. उगीच महाराष्ट्रात चुकीचा संदेश जायला नको. पडसाद उमटायला नकोत. प्रत्येक माणसासाठी आपल्याला सदैव तत्पर राहिले पाहिजे. पेशंट नाकारून नाही चालणार… त्यांचा संवाद सुरू होता. त्याही परिस्थितीत तो ऐकण्याचा मी प्रयत्न करीत होतो.
सर्व देवांचे नाव घेत होतो. रूग्णवाहिका नाही म्हटल्यावर तुषारने खासगही गाडी काढली. वार्‍याच्या वेगाने 7 मिनिटात डी. वाय. पाटील हॉस्पिटल गाठले.
स्ट्रेचर घेऊन कमर्चारी व दोन डॉक्टर तिथे स्वागतालाच उभे होते. गाडीतून उतरता क्षणी स्ट्रेचरवर घेतले. तात्काळ सर्व उपाय सुरू झाले. सलाईन, इंजेक्शन त्यात भरले. तात्पुरता धोका टळला….
पहाटे 5 वाजेपर्यंत डॉक्टर बाजूलाच होते, देखरेख करत. बोलता बोलता उपचार करणारे डॉक्टर म्हणाले, थोडा उशिर झाला असता तर प्रसंग बाका होता… मला कळले. मनोमन देवाला साकडे घातले.
सकाळी अतिदक्षता विभागात माझी रवानगी झाली होती. धोका मात्र टळला होता. याचा आनंद मुलाला व पत्नीला किती झाला असेल याचा अंदाज आला. कांतीलाल कडू यांच्या रूपाने माझ्यासाठी देवच धावून आला.
कांतीलालची चर्चा सर्व माझे नातलग इष्ट मित्रात रंगली. जिथे बेडच उपलब्ध झाला नव्हता, तिथे माझे काही तासात काय झाले असते? याचा प्रत्यय मी आणि माझ्या कुटूंबाने घेतला. तसा अनुभव अनेकांना आला असेल, येत असेल. पण कडू यांनी जे काही केले, त्यातून मला तातडीने बेड उपलब्ध झाला. खरंच त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
मी 9/10 दिवस हॉस्पीटलमध्ये कोरोनाशी झुंज दिली. कडू यांचे नाव ऐकणारे काही डॉक्टर तेथे होते. मला त्यांच्या नावामुळे चांगली सेवा मिळाली. हे प्रांजळपणे सांगावेच लागेल. तातडीने आयसीयूत बेड मिळावा, हे पुण्य माझ्या वाट्याला आले. आज काही घटना समोर येत आहेत. साधा बेड मिळत नाही. ऑक्सीजनचा तर नाहीच. आयसीयूत व्यवस्था तातडीने व्हावी, हे स्वप्नवत ठरत असताना मला सर्व सेवा केवळ कांतीलाल कडू यांच्यामुळे मिळाल्या. ते माझे भाग्य समजतो… आणि कडू यांची कर्तबगारी.
25 तारखेला मला जनरल वार्डात आणले. अगोदर ना. राजेश टोपे, ना. जितेंद्र आव्हाड, ना. अनिल देशमुख, केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास अठवले, ना. संजय बनसोडे अशा अनेक मंत्र्यांचे खासगी सचिव अनेक आमदार, माजी खासदारांचे फोन आले. तब्येतीची चौकशी केली. त्यावेळी कांतीलाल कडू यांनी केलेल्या सहकार्याची अनेक मंत्र्यांना कल्पना दिली. एका संपादकाने, सामाजिक कार्यकर्त्याने मला नवीन जीवन दिले, संजीवनी दिली.
माझी डी. वाय. पाटील हॉस्पिटल कर्मचारी यांच्या विषयी तक्रार नाही. तुषारने किती खर्च केला तोही सांगण्याची गरज नाही. महागडे मोठ्या रक्कमेचे इंजेक्शन, औषधे आणली. कोठेही तो कमी पडला नाही. मोठ्या शर्थीने सर्व कर्मचारी डॉक्टरांनी मला वाचविले आहे मात्र, याचे खरे श्रेय कांतीलाल कडू यांना जाते. त्या सर्वांचे कुटुंबाच्या वतीने त्रिवार अभिनंदन .
माझे जिवलगमित्र कांतीलाल कडू खासगी लुटारू डॉक्टरांचे कर्दनकाळ आहेत. अनेक गरीब रुग्णांच्या बिलात सुट मिळवून दिल्याच्या बातम्या ऐकत आलो आहे. अनेकांचे अश्रू त्यांनी पुसले आहेत. परंतु नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही, तीच अवस्था मला पाहायाला मिळाली आणि मला बेड मिळाला. अन्यथा माझे काही खरे नव्हते.
एका समाजसेवकाच्या मदतीला बंडखोर समाजसेवक आला. ही जमेची बाजू. चांगली कामे केली आयुष्यभर, लोकांना मदत केली. त्यांचे आशीर्वाद मिळाले म्हणून मी मृत्युच्या जबड्यातून बाहेर आलो.
तुषार सारखा दक्ष मुलगा, सावित्रीसारखी पत्नी ही माझी पुण्याई आहे. कडू यांची वेळेवर मिळालेली साथ यामुळेच मी पुन्हा नवीन जन्माने आपली सेवा करण्यासाठी कोरोनासारख्या व्हायरसवर विजय मिळविला.
देवाचे आशीर्वाद जरुर आहेत. परंतु मी मात्र म्हणेन कांतीलाल कडूंच्या हिंमतबाजपणामुळे डॉक्टरांना नमावे लागले. आपल्यावर त्याचा काय परिणाम होईल, कामात अडथळा आणला म्हणून केस होईल का? सरकार कारवाई करेल याची काहीही चिंता न करता समाजासाठी आपले आयुष्य निःस्वार्थीपणे खर्च केले ते समाजभूषण उत्तमराव गायकवाड जगलेच पाहिजेत म्हणून कडू यांनी धारण केलेला तो रूद्रावतार कधीही विसरू शकणार नाही. मी 29 तारखेला सुखरुप जनसेवेसाठी पुन्हा बरा होऊन आलो तुम्हा सर्वाच्या आशिर्वादामुळेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here