(संपादक सुनिल पाटील)
जगात अभियंता दिन वेग वेगळ्या तारखेस साजरा केला जातो. अर्जेंटीनात १५ जून, बांग्लादेशात ७ मे, बेल्जियममध्ये २० मार्च, कोलंबियात १७ अगस्त, आइसलैंडमध्ये १० एप्रिल, ईराण मध्ये २४ फेब्रुवारी, इटलीत १५ जून, मैक्सिकोत १ जुलै, पेरूत ८ जून, रोमानियात १४ सप्टेंबर, तुर्कीत ५ डिसेंबरला साजरा केला जातो तर भारतात आपण १५ सप्टेंबरला भारतरत्न डाॅ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस हा अभियंता दिन म्हणून साजरा करतो.
मोक्षगुंडम विश्वेश्वरैया या भारतरत्नाचा जन्म १५ सप्टेंबर १८६० ला कर्नाटक स्थित कोलार जिल्ह्यातील मुद्देनाहल्ली या गांवात झाला. पिता श्रीनिवास शास्त्री व माता वेंकटलक्ष्म्मा यांचे पोटी येवून त्यांनी जन उध्दारासोबतच जल उध्दार केला. विद्वान संस्कृत पंडितांच्या घरी जन्म घेतलेल्या या बाळावर लहानपणा पासूनच उच्च संस्कार झालेत. स्वाभिमानाने जगत असलेले हे घराणे तसे गरिबीशी झुंज देत असतांनाही मोक्षगुंडम विश्वेश्वरैयांना उच्च शिक्षणासाठी बैंगलोरला पाठविल्या गेले. तेथे त्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त करत बी. ए. केले. शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यांच्यातील गुणवत्ता ओळखून त्यांना म्हैसूरच्या राजाने पुण्यात अभियांत्रिकी पदवीसाठी शिष्यवृत्ती देऊन पाठविले. कॉलेज ऑफ इंजिनीयरींग, पुणे येथे १८८३ मध्ये ते पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झालेत. मिळालेल्या शिष्यवृत्तीची सोने करत विश्वेश्वरय्यानी बी. ई. उच्च पदवी प्राप्त केली. मुंबई राज्यात प्रथम क्रमांक घेऊन एक नवीन इतिहास त्यांनी घडविला.
त्यांच्या दैदिप्यमान यशाची सरकारने दखल घेत १८८४ ला त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी दिली. भारतीय पाटबंधारे महामंडळ येथून निमंत्रण आल्याने त्यांनी पाटबंधारे विभागात नौकरी केली. येथे सुद्धा त्यांनी आपल्यात असलेल्या गुणांचा ठसा उमटवित अनेक धरणासह पाटबंधारे कामांना गती देत विकास कामे करून दाखविली. स्वयंचलित गेटची निर्मिती करून खडकवासला धरणाला एक मूर्त रूप दिले. यामुळे वाहून जाणारे पाणी एका विशिष्ट पातळी नंतरच वाहून जाऊ लागले. या गेटचे वैशिष्ट म्हणजे हे स्वयंचलित होते आणि भारतात प्रथमच त्याची निर्मिती व उभारणी झाली होती. धरणातील पाणी साठ्याची पूरपातळी, पूर आल्यावर धरणास कोणताही धोका न होता त्याची व्दार उघड झाप स्वनियंत्रित असल्याने या गेटव्दारे मिळालेले ते सर्वोच्च यश होते. पुढे त्यांच्या डिझाइनचे नाव विश्वेश्वरैया गेट म्हणून प्रसिद्ध झाले.
सरकारी नोकरीतून २५ व्या वर्षी स्वतःहून निवृत्ती घेत १९०८ ला ते मुक्त झालेत. (नाही तर आज अजून वर्षे दोन वर्षे कशी वाढतील म्हणून फाईल घेवून जाणा-यांची कमी नाही. ) या अद्भूत कामांनी विश्वेश्वरैया यांची कीर्ती जगभरात पोहोचली होती. त्यांच्या कामाने भारावून हैदराबाद च्या निजामाने त्यांना त्यांच्या सरकारचे विशेष सल्लागार अभियंता म्हणून सन्मान देत बोलविले. या कार्य काळात त्यांनी हैद्राबाद परिसरात येणारा पूर थांबवण्यासाठी हैदराबाद शहराची पुर्नरचेनेसह मूसा व इसा या दोन्ही नद्यांना धरणे बांधून संभाव्य पुरापासून परिसर पूरमुक्त केला.
म्हैसूर संस्थानचे नरेश महाराजा कृष्णराज वाडियार यांच्या आग्रहाखातर म्हैसूर संस्थानच्या मुख्य अभियंता या बहुमान असलेल्या खूर्चीवर ते विराजमान झालेत. सर मो. विश्वेश्वरैया यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरण बांधण्याच्या प्रस्तावापासून ते उदघाटनापर्यंत सर्व कामांची देखरेख केली. (आज अनेक वर्षे होवूनही गोसीखुर्द, जिगांव, बेबंळा व विदर्भातील अनेक धरणे अपूर्ण तर आहेच, पण कामेही तोला मोलाचीच आहे, असे म्हणता येईल. कधी फुटतील, कधी पूर येवून भंडारा जलमय सारखी गत होईल हे सांगतां येत नाही.) सर मो. विश्वेश्वरैया यांनी कृष्णराजसागर या धरणाचे उत्कृष्ट बांधकाम तर केलेच, सोबत बांधकाम कालावधी सुध्दा कमी होता. यामुळे आशियातील सर्वात मोठे सरोवर अल्पकालावधीत निर्माण होवू शकले. यामुळे, ‘म्हैसूर राज्याचे पिता’ म्हणून त्यांना लोकांनी दिलेला हा बहुमान होता. म्हैसूर येथे १९२६ पर्यंत यांनी आपला कार्यकाळ घालवला. यात कृष्णराजसागर धरण व जगप्रसिद्ध असलेले वृंदावन गार्डन तसेच अनेक विकास कामे ही त्यांचीच देण आहे. तिरुमला-तिरुपती दरम्यानच्या रस्ते बांधणीत त्यांचे फार मोठे योगदान व वाटा हा सिहांचा आहे.
म्हैसूर राज्याचे दिवाण म्हणून सुद्धा १९१२ ते १९१८ ही सहा वर्षे त्यांनी जबाबदारी सांभाळली. जनतेसाठी शिक्षण, उद्योग, कृषी इत्यादी क्षेत्रांत सोबतच त्यांनी सरकारच्या नियंत्रणा खालील म्हैसूर सोप फॅक्टरी, किटकनाशक प्रयोगशाळा, आयर्न व स्टील वर्कस्, श्री जय पॉलीटेक्निक इंस्टीट्युट, बंगलोर ऍग्रीकल्चरल युनिव्हर्सिटी, स्टेट बॅंक ऑफ मैसुर, सेंचुरी क्लब, म्हैसूर चेंबर ऑफ कॉमर्स असे अगणीत औद्योगीक प्रकल्प सुरु केले. त्यांनी उद्योगात खाजगी गुंतवणुकीवर भर दिला. त्यांचा प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी असलेली तयारी ही त्यांची वैशिष्ट्ये होती. (आज हीच वैशिष्ट्ये सोडून खात्यात सर्व जलमय आहे तर रस्स्त्यातही आज वाटसरू सोबत वाटे करी पण आहे.) सर याच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे त्यांना, ‘नाईट कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी इंडीयन एंपायर’ या सन्मानाने गौरविले गेले. पण आपल्याकडे जलक्रांतीचे जनक – स्व. डाॅ. शंकरराव चव्हाण यांचे नावाने दिला जाणारा जल पुरस्कारही योग्य नियोजना अभावी घोळात घोळल्या जातो आणि महिनो उड्डाणानंतरही जाहीर होत नाही हा डाग आपल्या हातांनी लावला आहे.
विश्वेश्वरय्या यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेने देशातील अनेक योजना साकार झाल्या त्यात धुळे जिल्ह्यातील पांजरा नदी वक्र नलिकेव्दारे धुळे शहर पाणीपुरवठा, सुरत, कोल्हापूर, मुंबई, कराची, धारवाड व विजापूर शहर, सक्कर शहरासह सर्व ठिकाणच्या पाणीपुरवठ्याचा बिकट प्रश्न त्यांनी योजनांना मुर्तस्वरूप देवून सोडविला. कमीत कमी पाण्यात अनेक तऱ्हेच्या पिकांना पाणी देण्याची गट पद्धती त्यांचीच देण आहे. ओरिसा राज्यातील महापूराच्या नियंत्रणाचे निर्मातेही सरच आहे. कावेरी बंधारा योजना त्यांनीच पूर्ण केली. पुणे, हैदराबाद व म्हैसूर येथील भुयारी गटार योजना त्यांनी अभिकल्पित केल्या. नवी दिल्लीची योजनाबद्ध सुधारणा त्यांनीच केली. पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा अभ्यासक्रम ठरविण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.
समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, त्यांना सन १९५५ मध्ये ‘भारतरत्न’ या देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले गेले. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे १४ एप्रिल १९६२ रोजी निधन झाले. आज त्यांच्या जयंती दिनी अभियंता वर्गाने प्रामाणीकपणा, वेळेचे नियोजन व एखाद्या कामात पूर्ण समर्पणासाठी असलेली तयारी ही त्यांची वैशिष्ट्ये जरी अंगीकारली तरी त्यांचे समर्थ भारत हे स्वप्न साकार तर होईलच पण ख-या अर्थाने अभियंता असल्याचे समाधान मिळेल आणि सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभिवादन असेल.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना शत शत कोटी नमन.
अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना हार्दिक शुभेच्छा.







