नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज (सोमवार, १४ सप्टेंबर २०२०) सुरुवात झाली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांच्या मिळून २५ खासदारांना कोरोना झाल्याचे लक्षात आले.
लडाखचे भाजपचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल तसेच मीनाक्षी लेखी, प्रवेश साहिब सिंह वर्मा, अनंतकुमार हेगडे, सुखबीर सिंह, प्रतापराव जाधव, जनार्दन सिंह, हनुमान बेनीवाल, सेल्वमजी, प्रतापराव पाटील, रामशंकर कठेरिया, सत्यपाल सिंह यांच्यासह २५ खासदारांचे कोरोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. लोकसभेतील भाजपच्या १२, वायआरएस काँग्रेसचे दोन तर शिवसेना, द्रमुक आणि आरएलपी या तीन पक्षांच्या प्रत्येकी एका खासदाराला कोरोना झाला. तर राज्यसभेतील भाजप आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन, अण्णाद्रमुक, टीआरएस, आप आणि तृणमूल काँग्रेस यांच्या प्रत्येकी एका खासदाराला कोरोना झाला. कोरोनाबाधीत झालेल्या खासदारांना अधिवेशनात सहभागी होण्यास मनाई करण्यात आली आहे.
कोरोना संकट सुरू असल्यामुळे अधिवेशनाआधी सर्व खासदारांची कोरोना तपासणी करण्यात आली. या तपासणीचे अहवाल जाहीर झाल्यानंतर लोकसभेतील १७ आणि राज्यसभेतील आठ खासदारांना कोरोना झाल्याचे लक्षात आले. कोरोनाबाधीत झालेल्या खासदारांना आवश्यकतेनुसार होम क्वारंटाइन अथवा हॉस्पिटलमध्ये दाखल करुन त्यांच्यावर उपचार सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.
याआधी आज सकाळी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. दररोज सकाळपासून दुपारपर्यंत लोकसभेचे आणि दुपारपासून राज्यसभेचे कामकाज सुरू करण्याचा निर्णय झाला. कोरोना संकटामुळे पुरेशी खबरदारी घेऊन अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले. सर्व खासदारांची कोरोना चाचणी करुन घेण्यात आली. कोरोना झालेल्या खासदारांना संसदेच्या आवारात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली. संसदेचा परिसर निर्जंतुक करुन खासदारांना प्रवेश देण्यात आला. संसदेत सर्वजण मास्क घालून वावरत होते. अनेकांनी हातात ग्लोव्ह्ज घातले होते. ठिकठिकाणी सॅनिटायझरचीही व्यवस्था करण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी यांच्यासह सर्व दिवंगत खासदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रेक्षागृहांच्या जागेचा वापर संसद सदस्यांसाठी केला जात आहे. महामारीचे संकट सुरू असल्यामुळे संसदेत प्रेक्षकांना मनाई आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच संसदेच्या प्रेक्षागृहांचा वापर संसद सदस्यांसाठी केला जात आहे.
कोरोना संकटामुळे राज्यसभा आणि लोकसभेत ठिकठिकाणी स्क्रीन बसवून संसद सदस्यांना कामकाज बघण्याची आणि ऐकण्याची व्यवस्था केली आहे. तसेच प्रत्येक संसद सदस्याच्या आसनाजवळ पॉलीकार्बोनेट शीट बसवण्यात आली आहे. संसर्ग टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
पिण्यायोग्य कोमट पाणी, तुळशीची पानं, लवंग, मिरं, मोठी वेलची, आलं, गुळ, ओवा, दालचिनी यांचे मिश्रण करुन केलेला काढा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हा काढा संसदेच्या कँटीनमध्ये देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच संसदेच्या कँटीनमध्ये हळदीचे पाणी, हळद मिश्रीत दूध, पिण्यासाठी कोमट पाणीही दिले जात आहे.







