शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – तालुक्यातील वडाळी ते काकरदा दरम्यान असलेल्या रंगावली नदीवर पुल नसल्याकारणाने नागरिकांना दळणवळणासाठी त्रास होत आहे. रस्ता असून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे.सध्या पावसाळा सुरू असल्याकारणाने नदीला पूर आलेला आहे त्यामुळे महिला, लहान मुले तसेच वृद्धांना पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडताना त्रास होत आहे.
महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचेकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून वडाळी ते काकरदा दरम्यान 6.660 किलोमीटर लांबीच्या डांबरीकरण रस्त्याचे काम 2017 या वर्षी पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्याचा देखभाल व दुरुस्ती चा कालावधी पाच वर्षे असून सदर रस्त्यावर ठिकाणी अनेक छोट्या फरशी पुलाचे काम करण्यात आले आहे. परंतु वडाळी गावाच्या लगत नदीपात्र असल्याकारणाने एका मोठ्या पुलाची आवश्यकता असतांना तो शासनाकडून मंजूर झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.शासनाकडून जवळपास चार कोटी रुपये खर्च करून या रस्त्याचे काम करण्यात आले आहे परंतु रस्त्याच्या सुरुवातीलाच असलेल्या नदीपात्रामुळे त्या रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी काकरदा येथील लोकांना पाण्यातून कसरत करावी लागत आहे. सदरहू रस्त्यावरून दळणवळणासाठी जाणाऱ्या वाहनांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी या दोघा गावांना जोडणारा हा पूल अतिशय महत्त्वाचा असून याचे बांधकाम अजून कसे झाले नाही? याबद्दलही शंका जनतेच्या मनात निर्माण होत आहे. प्रशासनाने याबाबत योग्य ती चौकशी करून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी येथील जनता करीत आहे. रस्त्याचे काम तीन वर्षा आधीच पूर्ण झाले असतांना पुल बनविण्यासाठी एवढा वेळ का लागत आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.







