पुणे (उपसंपादक मनीष नेरुरकर) – महाराष्ट्रासह शेजारील राज्यातही संभाजी बिडीची विक्री गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या बिडीचं नाव बदलण्यात यावं अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा शिवप्रेमींनी ही मागणी उचलून धरली. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने विक्री होत असलेल्या या उत्पादनाचे नाव बदलण्याची मागणी संभाजी ब्रिगेडनेही केली होती. त्यासोबतच सोशल मीडियातही ही मागणी जोर धरत होती. हे सर्व पाहता बिडी उत्पादक साबळे-वाघिरे आणि कंपनीने नाव बदलण्याचं जाहीर केलं आहे.
पुण्यातील साबळे-वाघिरे कंपनीकडून संभाजी बिडीचं उत्पादन गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, बिडीच्या उत्पादनावर छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख असल्याने त्यात महाराजांचा अवमान होत आहे अशी भूमिका शिवप्रेमी, संभाजी ब्रिगेडसह इतर नागरिकांकडून होत होती. त्यानंतर आता साबळे-वाघिरे कंपनीकडून एक पत्रक काढण्यात आले असून त्यामध्ये संभाजी बिडीचं नाव बदलण्याचं कंपनीने सांगितलं आहे.
पुण्यातील साबळे-वाघिरे कंपनीकडून एक पत्रक काढण्यात आले आहे यामध्ये म्हटले आहे, संभाजी बिडी उत्पादनाचा हा आमचा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. आमच्या वडिलांनी संभाजी महाराजांच्या आदरापोटी हे नाव दिलेलं. पण आता नागरिकांच्या भावना लक्षात घेत आम्ही नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास काही दिवसांचा काळ लागेल आणि त्याची नोंद घ्यावी. यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आणि उत्पादनावरुन छत्रपती हा शब्द आम्ही काढला होता. त्यानंतर आता उत्पादनाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही ट्वीट करुन नाव बदलण्याची मागणी केली होती. आपल्या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी म्हटलं होतं, “छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे. लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा.







