नाशिक (विशेष प्रतिनिधी इजि.कुबेर जाधव) – जवळपास आठ महिने कांद्याचे दर सातशे आठशे रुपये क्विंटलच्या खालीच राहिले होते. काही वेळा एक ते तीन रुपये किलो दराने कांदा विकल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात झळकल्या होत्या. सरकारने कांद उत्पादकांना कवडीची ही मदत केली नाही.
भारताच्या दक्षिणी राज्यात अतिवृष्टीमुळे कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले व अचानक कांद्याच्या दराने उचल खाल्ली. आठच दिवसात कांदा २५०० रुपये क्विंटलच्या पुढे ढकलला. ज्या शेतकर्यंनी मोठ्या हिमतीने कांदा साठवला होता त्यांच्या अशा पल्लवित झाल्या. आता लॉटरी लागेल या आशेने थोडा थोडा कांदा बाजारात पाठवू लागले पण……..
१४ सप्टेंबरला केंद्र शासनाने एक आदेश काढला व कांद्याची निर्यात बंद केली. सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी. शेतकर्यांची सर्व स्वप्ने धुळीला मिळाली. शेतकरी संघटनेने आपले कर्तव्य बजावत आंदोलनाची हाक दिली, आंदोलने झाली ही. शेतकरी संघटना उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीला लागली. पुढे काय व्हायचे ते होइल पण सरकारने असा निर्णय का घेतला याचा उलगडा झाला पाहिजे.
जून महिन्यात तीन अध्यादेश काढुन शेतीमाल व्यापार खुला केला, कांदा बटाटा आवश्यक वस्तुच्या यादीतुन वगळले आहेत. शेतकरी संघटनेने सरकारच्या या निर्णयाला पाठिंबा दिला पण स्वागत नाही केले कारण आवश्यक वस्तू कायद्यात सरकारने ठेवलेली पळवाट. या वस्तुंच्या किमती ठराविक मर्यादे पेक्षा जास्त वाढल्या तर पुन्हा यादीत समाविष्ट करण्याच्या तरतुदीला विरोध करत त्या सुधारण्याची अपेक्षा सरकारकडे व्यक्त केली आहे.
शेतकर्यांना चांगले दिवस येतील अशी आशा लागली असतानाच कांदा निर्यातबंदीचा अचानक धक्का सरकारने देऊन शेतकर्यांचा मोठा विश्वासघात केला आहे.
या वेळेला निर्यातबंदी करताना सरकारने आवश्यक वस्तू कायद्याचा उपयोग न करता परराष्ट्र व्हवहार खत्याचा वापर केला आहे. सरकारच्या भात्यात असे आणखी किती शेतकरी विरोधी बाण आहेत माहित नाही.
देशांतर्गत कांद्याचे भाव वाढले तर परराष्ट्र व्यापारावर काय परिणाम होणार आहे का? नाही ! मग त्यांना निर्यातबंदी लावायची काय गरज पडली याचे उत्तर काही मिळत नाही. उलट असा निर्णय झाला तर परराष्टातील व्यापार्यांशी केलेले सौदे पुरे करता येणार नाहीत व देशाची बदनामी होऊन पुढे कांदा व्यापारा बाबत आपल्या देशाशी व्यापारी संबंध तोडले जाऊ शकतात. देशासाठी ही फार मोठी हानी आहे. काही वर्षापुर्वी कांद्याच्या जागतीक बाजारपेठेत भारताचा ८०% वाटा होता. सरकारच्या या धरसोडीच्या धोरणामुळे तो आता ४०% वर आला आहे. कांदा निर्यातीत चीन आपला मुख्य स्पर्धक आहे. सध्या सर्व जगाची चिन वर नाराजी असल्यामुळे भारताकडून कांदा आयात करण्याला प्राधान्य दिले होते परंतू या निर्यातबंदीमुळे ते देश पुन्हा चीनकडे वळू शकतात. खरे तर परराष्ट्र व्यापार मंत्रालयाने या निर्णयाला विरोध करायाला पाहिजे होता परंतू त्यांच्याच सहीने हा आदेश काढण्यात आला हे विशेष.
कोरोनामुळे देशातील उद्योग व्यापार ठप्प झाला आहे. देशाचा जि.डि.पी उणे झाला आहे. कृषी क्षेत्रानेच काही हातभार लावला आहे. कांदा निर्यात करुन परकीय चलन मिळत होते व अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होत होती अशातच ही निर्यातबंदी लावणे शहाणपणाचे अाहे असे कोणी म्हणू शकणार नाही.
अशा बिकट परिस्थितीत, कोणाचीच मागणी नसताना किंवा गरजही नसताना असा बेकायदेशीर निर्णय सरकारने का घेतला असावा? बिहारची निवडणुक जिंकण्यासाठी सत्तेतील भाजपाने हा निर्णय घेतला असा बहुतेकांचा अंदाज आहे व त्यात तथ्य आहे असे मानायला हरकत नाही कारण दुसरे काहीच कारण दिसत नाही. निवडणुक जिंकण्यसाठी सत्ताधारी पक्षाने कांद्याचे दर पाडण्याचे प्रयोग अनेक वेळा झाले आहेत. निवडणुक लागली की द्या कांदा उत्पदक शेतकर्यंचा बळी अशी अनिष्ट प्रथाच रुढ झाली आहे. निर्यातबंदीचा निर्णय राजकीय असेल तर त्याल उत्तरही राजकीयच असले पाहिजे. कांदा महाग झाला म्हणुन सरकारे पडत असतील तर कांदा स्वस्त केला म्हणुन सरकारे पाडण्याची तयारी जो पर्यंत शेतकरी करणार नाही तो पर्यंत निर्यातबंदी सारखे निर्णय वारंवार घेतले जातील. कांदा उत्पादक शेतकर्यांनी आपल्या मतांची दहशत निर्माण करण्याची गरज आहे.
एखादी व्यक्ती चक्कर येउन बेशुद्ध पडली तर त्याला शुद्धीवर आणण्यासाठी कांद्याचा वास देतात पण कांदा उत्पादक शेतकरी काही शुद्धीवर येताना दिसत नाही. निर्यातबंदी झाल्यबरोबर हजारो कांदा उत्पदकांनी स्वताच रसत्यावर उतरायला हवे होते. शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिल्यावर तरी यायला हवे होते पण तसे झालेले दिसत नाही. कांदा उत्पादक असो वा नसो संघटनेचे निष्ठावंत कार्यकर्ते रस्त्यावर आले, विविध पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर आले पण ज्यांच्याकडे हजारो लाखो रुपयांचा कांदा शिल्लक आहे ते आंदोलनात दिसत नाहीत ही अत्यंत खेदाची बाब आहे. याचे परिणाम ही कांदा उत्पादकांनाच भोगावे लागतील. परमेश्वर कांदा उत्पादकांना, आपल्या स्वार्थासाठी लढण्याची बुद्धी देवो अशी प्रार्थना करण्या पलिकडे आपण काय करू शकतो?







