चीनच्या हेरगिरी नेटवर्कला दिल्लीत चाप

नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील चीनचे हेरगिरी नेटवर्क दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने चाप लावला आहे. अटकेतील तिघांमध्ये एका भारतीय मुक्‍त पत्रकाराचाही समावेश आहे. पत्रकाराशिवाय पोलिसांनी एक चिनी महिला आणि एका नेपाळी युवकालाही अटक केली आहे.
मुक्‍त पत्रकार राजीव शर्मा याच्यावर तो चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप ठेवण्यात आला असून, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पुरेसे पुरावेही गोळा केले आहेत. शर्मा याला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. राजीव शर्मा याने ‘द ट्रिब्यून’ आणि ‘यूएनआय’मध्ये काम केलेले आहे. सध्या तो मुक्‍त पत्रकार म्हणून राजधानीत वावरत होता.
पत्रकार शर्मा याला प्रीतमपुरा येथील त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी शर्मा याच्या ताब्यातील चीनविषयक काही गुप्‍त कागदपत्रेही जप्‍त केली आहेत. शिवाय, त्याच्याकडून भारतीय संरक्षण खात्याशी संबंधित काही कागदपत्रेही जप्‍त करण्यात आली आहेत. शर्मा याला अधिकृत गोपनीयता कायद्यांतर्गत (ऑफिशियल सीक्रेसी अ‍ॅक्ट) अटक करण्यात आली आहे.
‘राजीव किशकिंदा’ नावाचे यूट्यूब चॅनल राजीव शर्मा चालवतो. सुमारे बारा हजार लोक त्याचे सबस्क्रायबर आहेत. ज्या दिवशी अटक करण्यात आली, त्यादिवशी शर्मा याचे दोन व्हिडीओ प्रसारित झाले होते. ‘चायना मे स्टील डू मिसचीफ’ नावाच्या एका कार्यक्रमाचा त्यात समावेश होता.
राजीव शर्मा याला बोगस कंपन्यांच्या नावाने भक्‍कम निधी उपलब्ध करून देणार्‍या चिनी महिलेसही अटक करण्यात आली आहे. तिच्या एका नेपाळी सहकार्‍यालाही अटक झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here