मुंबई (जॉनी वाझ) – अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणानंतर बॉलिवूडला ग्रहण लागलं आहे. कारण या प्रकरणाच्या तपासावरून बॉलिवूडमध्ये मोठं वादंग निर्माण झालं. अभिनेत्री कंगना रणौत हिच्यासह अनेकांनी बॉलिवूडमधील दिग्गजांना टार्गेट केलं. या सगळ्या वादाची चर्चा सुरू असतानाच अभिनेत्री पायल घोष हिने दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘अनुराग कश्यप याने माझ्यावर जबरदस्ती केली आहे,’ असा खळबळजनक आरोप पायल घोष हिने केला आहे. त्यामुळे एकीकडे बॉलिवूडवर आरोप करणाऱ्या कंगनाविरोधात जाहीर भूमिका घेतल्याने चर्चेत असलेल्या अनुराग कश्यप याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्याच्यावर थेट लैंगिक छळाचा आरोप करण्यात आला आहे.
अभिनेत्रीने अनुराग कश्यप याच्यावर आरोप करताना आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टॅग केलं आहे. ‘नरेंद्र मोदीजी आपण याप्रकरणी कारवाई करावी आणि या क्रिएटिव्ह माणसाआडचा राक्षस देशाला पाहू द्या,’ अशी विनंतीही पायलने केली आहे. ‘मला माहीत आहे की यामुळे माझे नुकसान होऊ शकते आणि माझी सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. कृपया मदत करा,’ असंही तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
पायल घोष हिने या ट्वीटसोबत तेलगू वृत्तवाहिनीचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. अनुरागने माझा लैंगिक छळ केला, तसंच अभद्र भाषेचाही वापर केला, असा आरोप या व्हिडिओतून पायल घोषने केला आहे.
एका मुलाखतीत पायलने अनुराग कश्यपने आपल्यासह काय काय केलं हे सविस्तर सांगितलं आहे. तिने त्या घटनेचा पूर्णपणे उलगडा केला आहे. पायल म्हणाली, “मी अनुराग यांना भेटायला त्यांच्या यारी रोड इथल्या ऑफिसमध्ये गेली होती. ते दुसऱ्या कुणाशी तरी बोलत होते म्हणून मी पुन्हा आले. दुसऱ्या दिवशी त्यांनी मला फोन केला आणि बोलावलं. काही ग्लॅमरस घालू नको जेणेकरून मी अभिनेत्री वाटेन असं त्यांनी सांगितलं. मग मी सलवार कमीज घालून त्यांना भेटायला गेला. त्यावेळी त्यांनी माझ्यासाठी जेवण बनवलं, आमचं जेवण झाल्यानंतर त्यांनी माझी जेवणाची प्लेटही उचलली. त्यानंतर मी तिथून निघून आले. त्यांनी मला पुन्हा मेसेज करून बोलावलं. मात्र तेव्हा खूप उशीर झाला होता म्हणून मी त्यांना भेटायला नाही येऊ शकत असं सांगितलं”
यानंतर दोन-तीन दिवसांनी आपण अनुराग यांना पुन्हा भेटलो, यावेळी आपण त्यांच्या घरी गेलो असं पायलनं सांगितलं. पायल म्हणाली, “त्यांनी मला घरी बोलावलं होतं. ते स्मोकिंग करत होते, मी तिथं बसले होते. काही वेळानंतर त्यांनी मला दुसऱ्या खोलीत नेलं. तिथं त्यांची पत्नी कल्की कोचलिनच्या खूप चपला होत्या, ते दाखवत त्यांनी मला सांगितलं, माझी पत्नी माझ्यावर रागावली आहे, ती अमेरिकेला गेली आहे. त्यानंतर अनुराग यांनी मला अडल्ट फिल्म दाखवली, तेव्हा मी खूप घाबरले. अचानक ते माझ्यासमोर न्यूड झाले आणि मलादेखील माझे कपडे काढायला सांगितले. मी त्यांना म्हटलं मला कन्फर्टेबल वाटत नाही आहे”
“मी ज्या अभिनेत्रींसह काम केलं आहे, त्या फक्त एका कॉलवर माझ्याकडे येण्यासाठी तयार आहेत, असं अनुराग मला म्हणाले. मी पुन्हा त्यांना सांगितलं, मला अस्वस्थ वाटतं आहे, मला बरं नाही वाटत आहे. काही तरी करून मी तिथून कसेबसे पळाले. त्यानंतर मी त्यांना कधीच भेटले नाही. त्यांनी अनेकदा मला भेटायला बोलावलं. मात्र आजपर्यंत मी ती घटना विसरू शकले नाही, मला त्याचा आजही त्रास होतो”, असं पायल म्हणाली.
पायल पुढे म्हणाली, “मी काय करू मला काहीच समजत नव्हतं. माझ्या मित्रांनी मला सांगितलं, पोलिसात तक्रार कर पण मी नाही केली. मी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला मात्र माझ्या कुटुंबाने आणि जवळच्या मित्रांनी मला गप्प राहायला सांगतिलं. त्यांना माझ्या भविष्याची चिंता होती. मीटू कॅम्पेन सुरू झाल्यानंतरही माझं कुटुंब, मॅनेसजरसह इंडस्ट्रीतील अनेकांनी मला गप्प राहण्यासाठी सांगितलं. कारण यामुळे माझं करिअर उद्ध्वस्त होईल, अशी भीती वाटत होती”







