भिवंडी (विशेष प्रतिनिधी) – टोरेंट पॉवर लिमिटेड ह्या भिवंडी व मुंब्रा परिसरात विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कडून 25 जानेवारी 2007 पासून भिवंडी परिसरात विद्युत पुरवठा करण्यासाठी फ्रेंचायजी घेतली होती ती आजही सुरु असून दि. 26 जानेवारी 2017 रोजी तिचे नूतनीकरण करून मुदतवाढ देण्यात आली आहे.
12 वर्ष 7 महिन्यांपासून टोरेंट कंपनी भिवंडी परिसरात विद्युत वितरणाचा व्यवसाय करत आहे व सदर कंपनीने आजपर्यंत हजारो कोटींचा नफा कमविला आहे. कंपनी कायदा 2013 मधील कलम 135(5) नुसार ज्या कंपनीची मालमत्ता 500 कोटी पेक्षा जास्त आहे किंवा ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल 1000 कोटी पेक्षा जास्त आहे किंवा ज्या कंपनीचे वार्षिक उत्पन्न 5 कोटी पेक्षा जास्त आहे अशा कंपनीला तिच्या वार्षिक उत्पन्नाच्या नफ्याच्या 2% रक्कम ती कंपनी ज्या भागात कार्यरत आहे अशा ठिकाणी व्यावसायिकांची सामाजिक जबाबदारी म्हणून (CSR) फंडाच्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात किंवा शासनाने मान्यता दिलेल्या क्षेत्रात कामे करून खर्च करणे बंधनकारक आहे.
टोरेंट पॉवर लिमिटेडने सन 2018-19 मध्ये रु. 29.59 कोटी, सन 2017-18 मध्ये रु. 15.02 कोटी, सन 2016-17 मध्ये 23.05 कोटी, सन 2015-16 मध्ये रु. 10 कोटी असा कोट्यवधी रुपयांचा CSR निधी फक्त्त गुजरात मध्ये खर्च केलेला आहे.
टोरेंट पॉवर कंपनी भिवंडी सर्कल मध्ये विद्युत वितरणाचा व्यवसाय गेली 12 वर्ष 7 महिने करून कोट्यवधी रुपये कमावत असताना सदर कंपनीने भिवंडी सर्कल अथवा ठाणे जिल्ह्यात एकही काम CSR फंडातून केलेले नाही. सदर कंपनीस महावितरण तर्फे मुंब्रा येथे सुद्धा वीज वितरणाचा व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे त्याठिकाणीही त्यानी CSR निधीतून कोणतेही काम केलेले नाही.
त्यामुळे कोरोनासारख्या राष्ट्रीय विपत्तीत ही टोरेंट पॉवर लिमिटेड ने सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी परिसरातील कायदेशीर सामाजिक जबाबदारी झटकुन पी.एम केअर फंडात 100 कोटी दिल्याचे समजते.
त्यामुळे संतप्त भिवंडीकरांच्या भावना ग्रामपंचायत कवाड खुर्द चे सदस्य प्रशांत रामचंद्र डोंगरे व निलेश गुरुनाथ गुरव यांनी ज्येष्ठ शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना रितसर निवेदन दिले असून सीएसआर निधीच्या माध्यमातून covid 19 च्या पार्श्वभूमीवर 50 रुग्णवाहिका, 10 शव वाहिका व 500 व्हेंटीलेटर्स भिवंडी व ठाणे जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे . सदर निवेदनाच्या प्रती विष्णू गवळी यांनी राज्याचे मुख्य सचिव संजीव कुमार, प्रधान सचिव आरोग्य विभाग, प्रधान सचिव उद्योग विभाग व मा.जिल्हाधिकारी ठाणे यांनाही पाठविल्या आहेत.
राज्य सरकारने सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन टोरेंट पॉवर लिमिटेड वर योग्य ती कारवाई तातडीने करण्याची मागणी समस्त भिवंडीकर करत आहेत.







