शहादा (विजय पाटील) – शहादा तालुक्यातील भाजपा महिला आघाडीने कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत तहसीलदार यांना कारवाई संदर्भात निवेदन सादर केले.
राज्यातील विविध कोविड सेंटरमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या सध्या प्रसारित होत आहेत परंतु महिलांच्या सुरक्षिततेसाठी कुठलीही व्यवस्था सरकारकडून करण्यात आलेली दिसून येत नाही. तरी कोविड सेंटरमध्ये महिलांसाठी स्वतंत्र वार्डची निर्मिती करण्यात यावी. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी महिला स्टाफची व्यवस्था करण्यात यावी. 
कोरोना महामारीचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असून महिलां रुग्णांची संख्या देखील वाढली आहे त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र वार्डची निर्मिती करून महिला सुरक्षेचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो तरी याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे असे निवेदनात भाजपा महिला आघाडीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात आला नाही तर भाजपा महिला आघाडी आक्रमक होऊन तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ किन्नरी सोनार ,नंदा सोनवणे जिल्हा उपाध्यक्षा, प्रतिभा पवार तालुकाध्यक्ष ,सीमा सोनगिरे शहराध्यक्षा आणि इतर महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 







