नवी दिल्ली – देशभरात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्या परिस्थितीत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) तसेच आयसीएसई मंडळाने १० वी तसेच १२ वीच्या परीक्षा रद्द करण्याची तयारी दर्शवली. परंतु, सरासरी गुणदान पद्धतीच्या आधारे यंदा सीबीएसई तसेच आयसीएसई मंडळाकडून जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत निकाल लावले जावू शकतात, अशी माहिती मंडळांकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आली आहे.
दरम्यान दोन्ही मंडळांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बोर्डाची परीक्षा रद्द झाली असली, तरीही सरासरी गुणांनी समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांना भविष्यात पुन्हा परिक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर करून परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करवून देण्यात येईल, अशीही माहिती न्यायालयात देण्यात आली आहे.
दोन्ही मंडळांची प्रतिज्ञापत्रक जवळपास सारखीच आहेत. मात्र, सरासरी गुण देण्याच्या पद्धतींमध्ये थोडा फरक आहे, अशी माहिती आयसीएसई मंडळाचे वकील जयदीप गुप्ता यांनी दिली. यंदा फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये दोन्ही मंडळाच्या परीक्षा घेण्यात येणार होत्या. काही विषयांचे पेपर झाले आहेत. मात्र तेव्हापासून देशात कोरोनाचा फैलाव होण्यास सुरूवात झाल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. जुलै महिन्यात पुन्हा परीक्षा घेण्याची तयारी होती. परंतु, महाराष्ट्रसह दिल्ली तसेच देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना बाधितांचा वाढता आकडा पाहता परीक्षा रद्द करण्याची तयारी बोर्डाकडून दाखवण्यात आली आहे.







