बांबू झोळी करतेय रुग्णवाहिकेचे काम….. काही केल्या आदिवासींच्या मरण यातना काही संपेना..

नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण गृ.ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणारं एक छोटेसे गाव म्हणजे नयामाळ. या गावात अनेक रुग्ण आजारपणामुळे त्रस्त असल्याने रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी बांबूची झोळी रुग्णवाहिकेचे काम करतांना दिसत आहे.
दवाखाना गावापासून जवळपास ८ ते १० कि.मी. लांब असल्याकारणाने या डोंगरांमधून लाकडाची किंवा बांबूची झोळी करून रूग्णाला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कसरत करावी लागते. या गावातील जोसा बाई सोन्या वसावे वय वर्षे 40 ही महिला अचानक आजारी पडली, तिला चालता येईना म्हणून तिला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी एकच पर्याय तो म्हणजे बांबूची झोळी आणि डोंगरदऱ्यातून पायी चालत जाण्याचा जीवघेणा प्रवास.नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून सातपुडा पर्वतरांगेमध्ये वसलेल्या अनेक गावांमध्ये आरोग्यसेवा उपलब्ध नसल्याने ,तसेच रस्ता उपलब्ध नसल्याने रुग्णाला दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी अशी कसरत करावी लागते यासंदर्भात मागील दोन महिन्यापासून प्रसारमाध्यमांनी अनेक बातम्या प्रसारित केल्या परंतु अद्यापही प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे व्यवस्था या दुर्गम भागातील लोकांसाठी करण्यात आलेली नाही.एवढेच नव्हे तर लोकशाही असलेल्या देशात निवडून दिलेले राजकीय प्रतिनिधी देखील या भागाकडे कधी फिरकलेच नाही ,त्यांचे प्रश्न समजून घेण्यात त्यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे.
जणूकाही या आदिवासी भागात जन्म घेऊन त्यांनी मोठा गुन्हा केला आहे म्हणून त्यांना या मरण यातना सहन कराव्या लागत आहेत. अतिदुर्गम भागातील लोकांच्या समस्यांचा डोंगर कधी कमी होईल , हाच प्रश्न निर्माण होतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here