माजी मंत्री एकनाथराव खडसे प्रवेशाचा विषय राष्ट्रवादीच्या दरबारात

मुंबई (हितेश मिस्त्री) – जिल्ह्यातील प्रश्‍नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज (दि.२३) मुंबईत जिल्ह्यातील नेत्यांची बैठक सुरू असून यात भाजपचे मातब्बर नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपवर नाराज असणारे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला असल्याने ते पक्षांतराच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक आढावा तसेच माजी मंत्री व भाजपवर नाराज नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चाचपणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बुधवारी जिल्ह्यात येणार होते. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला आहे. त्याऐवजी शरद पवार हेच मुंबईत बैठक घेणार आहेत. पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांना मुंबईत बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आदींसारखे मातब्बर नेते हजर आहेत. तर जिल्ह्यातून माजी मंत्री गुलाबराव देवकर व आमदार अनिल भाईदास पाटील यांचीही उपस्थिती आहे.
या बैठकीत एकनाथराव खडसे यांच्या पक्षातील प्रवेशाबाबत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. खडसेंनी यांनी गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला त्रास दिला असा जाहीर आरोप केला होता. पक्षाने अन्याय केल्यामुळे त्यांनी पक्षात राहू नये असा सूरही त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ते शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीत जाणार या बाबत चर्चा सुरू झाली.
शिवसेना नेते तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही ते पक्षात आल्यास त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यात येवून आढावा घेणार होते. मात्र आता पक्षाचे नेते शरद पवारच आढावा घेत असल्याने या राष्ट्रवादीच्या दरबारात काय निर्णय होतो याकडे जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here