शिवसेनेचे अभ्यासू नगरसेवक माजी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे निधन

ठाणे (सहसंपादक एस ए बनसोडे) – कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेचे माजी महापौर आणि शिवसेनेचे अभ्यासू नगरसेवक राजेंद्र देवळेकर यांना कोरोनाची लागण झाली होती. मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. राजेंद्र देवळेकर अभ्यासू नगरसेवक असल्याने सर्वच पक्षात तसेच सामाजिक क्षेत्रात लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने कल्याण डोंबिवली महानगर पालिकेतून अभ्यासू नगरसेवकाची अचानकपणे एक्झिट झाल्याने पालिका क्षेत्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
राजेंद्र देवळेकर हे शिवसेनेचे नेते होते. त्यांना समाज सेवेची आवड आल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेताना शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेच्या भाग घेत कल्याणातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले होते. तसेच ते भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते. कल्याणातील शिवसेनेच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. पालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुक १९९५ सालापासून ते आजमितीपर्यंतच्या पाच पालिका निवडणुकीत ते शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. पालिकेतील सर्व विषयावर त्यांचा जास्त अभ्यास असल्याने सभागृहात मुद्देसूद विषयाद्वारे पालिकेतील नागरी समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत प्रश्न सोडवण्यात त्यांचा हातखडा होता.
गेल्या महिनाभरापासून कोरोनाची लागण झाल्याने त्यांना डोंबिवलीतील नियाँन रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने गेल्या दहा -आठ दिवसांपूर्वी त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी उपचारादरम्यान अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
राजेंद्र देवळेकरांच्या अकाली एक्झिटमुळे ठाणे उपनगरातील शिवसेनेचा एक सच्चा कार्यकर्ता हरपला असून मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here