मुंबई (हितेश मिस्त्री) – भाजपमध्ये मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप करीत पक्षांतराच्या तयारीत असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये घेण्यास जळगावमधील दोन माजी राज्यमंत्र्यांनी कडाडून विरोध केला आहे. जळगाव जिल्ह्यातील विशेषत: मुक्ताईनगरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनाही खडसे यांनी दिलेल्या त्रासाची जंत्रिच या दोन राज्यमंत्र्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर वाचून दाखविली.
भाजप नेते खडसे यांना राष्ट्रवादीत घेण्यासंदर्भात मुंबईतील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली होती. सुमारे २ तास ही बैठक सुरु होती. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, विधानसभा माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविणारे संजय गरुड, अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांच्यासह माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील व गुलाबराव देवकर आदी प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.
बैठकीतील बहुसंख्य नेत्यांनी खडसेंना पक्षात घेतल्यास जळगावमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढेल. तसेच जिल्ह्यात भाजपाला वेसण लावता येईल, असे मत पवार यांच्यासमोर व्यक्त केले. मात्र, देवकर आणि पाटील या दोन्ही माजी राज्यमंत्र्यांनी खडसेंच्या प्रवेशाला विरोध केला. खडसे यांच्या मागे आता जनमत राहिले नाही. तसेच त्यांचा मागील राजकीय इतिहास जळगावकरांना माहीत असल्याने त्यांच्या प्रवेशाने पक्षाचे मोठे नुकसान होईल. गेल्या 30 ते 35 वर्षांपासून खडसे यांनी आपल्या विरोधातील नेते आणि पदाधिकार्यांना राजकीय त्रास दिला आहे. त्यांच्या विभागांमध्ये विकासकामे होऊ दिली नाहीत.
राज्यात ज्यावेळी भाजप सत्तेत आला, त्या प्रत्येकवेळी खडसे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांना त्रास दिला आहे. आता भाजपमध्ये आणि जळगाव जिल्ह्यातही खडसे यांची राजकीय ताकद राहिलेली नाही, अन्यथा त्यांची कन्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाली असती. तरीसुद्धा पक्षाची इच्छा असेल तर खडसे यांना दोन अटीवर पक्षात घ्यावे. खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडके यांना खासदारकीचा राजीनामा देण्यास सांगावे आणि किमान एक वर्ष तरी खडसेंना पक्षात आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये स्थान देऊ नये. या कालावधीत त्यांना सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करण्यास सांगावे, अशी सूचना या दोन राज्यमंत्र्यांनी पवार यांच्या समक्ष मांडल्याचे समजते.
खडसे यांच्यासारख्या राजकीय नेत्याला पक्षात घेण्याबाबत कोणीही उघडपणे विरोध करणार नाही, अशी शक्यता होती. मात्र, या दोन नेत्यांनी थेट शरद पवार यांच्या समोरच खडसेंची जंत्रीच मांडल्याने राष्ट्रवादीमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. दरम्यान याबाबत एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले.







