मुंबई (हितेश मिस्त्री) – ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) आपल्या तपासाला गती दिली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआय तपास करत असताना एनसीबीची या प्रकरणात एन्ट्री झाली. एनसीबी आता आणखी काही लोकांना चौकशीसाठी नोटीस पाठविण्याची तयारी करत आहे. पुढील तीन दिवसात एनसीबीकडून सारा अली खान, दीपिका पदुकोण आणि श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अंमली पदार्थ तस्करांच्या चौकशीत यांची नावे पुढे आली आहेत.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज अँगलची चौकशी करणाऱ्या एनसीबीला मोठे यश आले आहे. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकल्यानंतर एनसीबीने ६ जणांना पकडले होते. बॉलिवूड ड्रग्स रॅकेटमधून या ६ जणांचे संबंध असल्याचे बोलले जात आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी संबंधित या ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती मुख्य आहेत. दोघांनी सुशांत सिंह राजपूतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याची कबूली दिली आहे. दरम्यान, एनसीबीच्या पथकाने लोणावळ्यातील तो हँगआउट बंगला शोधला आहे. त्या ठिकाणी असे काही पुरावे सापडले आहेत जे नशेच्या आरोपाची पुष्टी करताना दिसून येत आहे.







