फिटले अंधाराचे जाळे, झाला मोकळा प्रकाश 

कळवण शहरात दीनदयाल योजनेअंतर्गत 39 ग्राहकांना वीज जोडणी

कळवण शहरातील आदिवासी वस्तीत वीज जोडणी प्रसंगी महावितरणचे कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे,उपकार्यकारी अभियंता नितीन अंबाडकर,शहर सहायक अभियंता एम.एस.बागुल,जनमित्र व ग्रामस्थ.

कळवण (तालुका प्रतिनिधी महेश कुवर) – कळवण शहरातील ओतूर रोड लगत असलेल्या आदिवासी (भिलाटी )वस्ती विजेअभावी अंधारात होती.शहराच्या विविध भागात विकासाची कामे झाली मात्र वीजेअभावी आदिवासी बांधवाना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते, आमदार नितीन पवार व कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार यांच्या पाठपुराव्यामुळे महावितरणने अखेर तिथे वीज जोडणी झाली आणि वीजपुरवठा सुरू झाल्याने आदिवासी (भिलाटी )वस्ती प्रकाशमान झाली. त्यामुळे नागरिकांनी आमदार पवार, गटनेते पगार व महावितरणच्या अधिकारी व यंत्रणेला धन्यवाद देत आनंदोत्सव साजरा केला.
कळवण शहरातील नगरपंचायत हद्दीतील ओतूर रोड लगत असलेल्या आदिवासी वस्तीतील दारिद्रय रेषेखालील आदिवासी व मजूर या  श्रमिकांच्या वस्तीपर्यंत वीज जोडणी झालेली होती. मात्र वस्ती परिसरातील 39 घरामध्ये तांत्रिक अडचणीमुळे वीज जोडणी करण्यात आली नव्हती त्यामुळे अंधाराचा सामना करावा लागत होता. विधानसभेच्या निवडणुक प्रचारात आमदार नितीन पवार व कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार यांनी आदिवासी वस्तीत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आमदार पवार व  नगरपंचायतच्या माध्यमातून पाठपुरावा होऊन प्रयत्नांना यश आले.
कित्येक दिवसापासून पासून रखडलेल्या कामाला सुरुवात झाली. महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता रुपेश  टेम्भूर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली  उपकार्यकारी अभियंता नितीन आंबडकर  यांनी आदिवासी वस्तीत नवीन रोहित्रची उभारणी करुन दीनदयाल योजनेअंतर्गत वस्तीतील 39 घरांना  वीज जोडणी दिली आणि  वीज पुरवठा सुरू करण्यात आला.
यावेळी वीज ट्रान्सफॉर्मरचे उद्‌घाटन आदिवासी वस्तीतील गणेश माळी, बाळू वाघ, रतन मोहन, दादाजी मोरे यांच्या हस्ते करण्यात आले,  कळवण विभागीय कार्यालयाचे सहायक अभियंता गणेश भट यांनी परिश्रम घेऊन विद्युतीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले.यावेळी कळवण विभागाचे कार्यकारी अभियंता रुपेश टेंभुर्णे,उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीन अंबाडकर,कळवण शहर सहायक अभियंता एम.एस.बागुल तसेच कळवण शहरातील जनमित्र व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here