महिलेवर अत्याचारप्रकरणी पोलिस निरीक्षकावर गुन्हा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – प्लॉट दाखविण्याच्या बहाण्याने नेऊन एका 50 वर्षीय महिलेस कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन 2009 पासून अत्याचार केल्याप्रकरणी सध्या सोलापुरातील केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक चंद्रकांत माने याच्याविरुद्ध पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
चंद्रकांत भगवानराव माने हे पुण्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत असताना त्यांची एका 50 वर्षीय महिलेबरोबर ओळख झाली. दरम्यान, ओळख वाढल्यानंतर माने यांनी त्या महिलेस पुण्यातील भवानी पेठेतील प्लॉट दाखविण्याच्या बहाण्याने नेले व तेथे गेल्यावर कोल्ड्रिंकमधून तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. माने याने तशाप्रकारे फोटो व व्हिडीओ शूटिंग काढले. हा प्रकार समजल्यावर माने याने त्या महिलेस ही गोष्ट कोणाला सांगितली तर ते फोटो व व्हिडीओ शूटिंग तुझ्या सर्व नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. तसेच आपण लग्न करू, असे आश्वासन दिले.
त्यानंतर ती महिला लग्न कधी करणार म्हणून मागे लागल्यानंतर लग्न करतो म्हणून पुन्हा अत्याचार केला. त्यानंतरसुद्धा तिने लग्नाबाबत विचारल्यावर माने याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. पोलिस ठाण्यात फिर्याद दिली तर वेगळे परिणाम होतील, अशी धमकी दिली. 17 फेब्रुवारी 2020 रोजी माने याने त्या महिलेच्या मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर स्वत:चे अश्लिल फोटो पाठविले. त्यानंतर लॉकडाऊनमध्येही माने याने तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिस पुरावे गोळा करत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.
या फिर्यादीनुसार पुण्यातील समर्थ पोलिस ठाण्यात सध्या सोलापुरातील केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक चंद्रकांत भगवानराव माने यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here