मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलीवूडमधील ड्रग्जसंबंधीच्या प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी) शनिवारी अभिनेत्री दीपिका पदुकोणची चौकशी होणार असतानाच 2017 मध्ये ज्या व्हॉटस्अॅप ग्रुपवर दीपिकाने ‘हैश’ (हशीश) आणि ‘माल है क्या?’ यांसारखे चॅट केले होते. त्या ग्रुपची ती स्वत: अॅडमिन असल्याचे वृत्त शुक्रवारी सोशल मीडियावरून पसरले होते.
माध्यमांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दीपिकाशिवाय तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीची मॅनेजर म्हणून काम केलेली जया साहा यासुद्धा ग्रुपच्या अॅडमिन होत्या. काही महिन्यांपूर्वीच हा ग्रुप डिलिट करण्यात आला. या ग्रुपमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्रींसह त्यांचे मॅनेजरही जोडले गेले होते.
एनसीबीला ग्रुपवरील अनेक ड्रग चॅट मिळाले आहे, ज्याच्या आधारावर ते ड्रग सिंडिकेट ऑपरेट केल्याचा गुन्हा दाखल करू शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रुपमध्ये 12 सदस्य होते. यामध्ये क्वान एंटरटेन्मेंट कंपनीचे सह-संस्थापक अनिर्बान दास ब्लाह, विजय सुब्रमण्यम, मधु मेंटेना, ‘क्वान’ कंपनीचे सीईओ ध्रुव यांचा समावेश होता.
करिश्माने चौकशीत सांगितले की, मी जया साहाच्या सूचनेनुसार काम करत होते. दीपिकासोबत माझी अनेकदा चर्चा झाली. जया आणि दीपिकामधील चर्चाही करिश्माने घडवून आणली होती. करिश्माने दीपिकासाठी ड्रग्ज खरेदी केल्याचे मान्य केले आहे. ग्रुपवरील चॅटवरून सेलिब्रिटीज आपल्या स्टाफ किंवा मॅनेजरसाठी ड्रग्जची खरेदी करत होते असे स्पष्ट होते.
एनसीबीने केलेल्या चौकशीत करिश्मा प्रकाशने ड्रग्जशी संबंधित कोणत्याही प्रकरणात सहभागी असल्याचा स्पष्टपणे इन्कार केला आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, करिश्माच्या चौकशीला सुरुवात होताच ती रडू लागली. एनसीबीने तिच्या या ग्रुपमधील सहभागाचे पुरावे सादर केले असता, तिने दीपिकासंबंधी अनेक मोठे खुलासे केले. करिश्माने सांगितले की, या ग्रुपमध्ये दीपिकानेच जबरदस्तीने मला सामील करून घेतले होते.






