मुंबई (वृत्तसंस्था) – रिया चक्रवर्तीने भाऊ शौविकमार्फत अमली पदार्थ मिळविले आणि ते सुशांतला पुरविले, असे अमली पदार्थ नियंत्रण मंडळाच्या (एनसीबी) अधिकार्याने शुक्रवारी सांगितले.
सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाचा तपास करीत असलेल्या एनसीबीने अमली पदार्थांचा या घटनेशी काय संबंध आहे, याबाबत शोध सुरू केला आहे. हे पदार्थ सुशांतपर्यंत कसे पोहोचविले जात होते, त्याच्याशिवाय आणखी किती नट-नट्यांचा अमली पदार्थांशी संबंध आहे, हेदेखील तपासले जात आहे. ड्रग माफिया बासित परिहारचीही एनसीबीने चौकशी केली. त्यात शौविक चक्रवर्तीचे नाव पुढे आले. चौकशीत शौविकनेही परिहार व कैझान इब्राहिमकडून ड्रग घेतल्याचे आणि ते बहीण रियाला दिल्याचे मान्य केले.
त्यानंतर सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि स्वयंपाकी दीपेश सावंत यांनी या अमली पदार्थाची सिगारेट करून सुशांतला देत होतो, अशी कबुली दिल्याचा दावा एनसीबी अधिकार्याने केला आहे. पैशाच्या अफरातफरीचा तपास करताना अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) व्हॉटस् अॅपवरील काही संदेश संशयास्पद वाटले. ईडीने याबाबत एनसीबीला माहिती दिली. या माहितीची तांत्रिक पडताळणी केल्यानंतर अमली पदार्थांचा प्रवास 27 व 28 ऑगस्टच्या रात्री झाल्याचे उघडकीस आला.






