चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९० वा हुतात्मा स्मृतिदिनी शहिदांना अभिवादन

रायगड (प्रतिनिधी दिप्ती पाटील) – शुक्रवार ( दि.25 सप्टेंबर) उरण चिरनेर येथे आज चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 90 वा हुतात्मा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. भारताच्या स्वातंत्र लढ्यातील २५ सष्टेंबर १९३० च्या चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या तेजस्वी लढ्याचे स्मरण व या लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आभिवादन मोठ्या शासकीय तोफांच्या सलामी ने करण्यात आले.
या हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी पोलीस, प्रशासन , शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार मनोहरशेठ भोईर, सर्व राजकीय पक्षांनचे कार्यकर्ते चिरनेर ग्रामपंचायत सदस्य व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काय आहे चिरनेर जंगल सत्याग्रह?
१९३० साली झालेल्या जंगल सत्याग्रहामुळे चिरनेर गाव भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नकाशावर आले. आगरी, कोळी, आदिवासी, कातकरी इ. लोकांचे ह्या परिसरात प्राबल्य असून त्यांचा शेती हा पारंपारिक व्यवसाय होता. चिरनेर आणि परिसरातील कळंबसुरे, मोठी जुई, कोप्रोली, खोपटे, पाणदिवे, भोम, धाकटी जुई, विंधणे, दिघोडे इ. गावातील गावकऱ्यांनी २५ सप्टेंबर १९३० इंग्रजांनी ना जंगलातील लाकडे तोडण्यास २५ सप्टेंबर १९३० रोजी इंग्रजांनी विरोध केला. परंतु गावकऱ्यांनी काठ्या, कोयते, कुऱ्हाड, विळे इ. विविध अवजारे घेऊन इंग्रजांचा जंगल कायदा तोडून सत्याग्रह केला. ह्या सत्याग्रहासाठी परिसरातील अनेक लोक रस्त्यावर आली. महात्मा गांधीनी सुरु केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीला पाठींबा देण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी जीवाची तमा न बाळगता सत्याग्रह करून इंग्रजांचा रोष ओढून घेतला.
सत्याग्रह चालू असताना इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात आणि लाठीहल्ल्यामुळे अनेकांना अपंगत्व आले, तर धाकू गवत्या फोफेरकर (चिरनेर), आनंदा माया पाटील (धाकटी जुई), रामा बामा कोळी (मोठी जुई), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), नाग्या महादू कातकरी (चिरनेर), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसूराम बुधाजी घरत (खोपटे), हे सत्याग्रही हुतात्मा झाले. या जंगल सत्याग्रहाला चिरनेर जंगल सत्याग्रह म्हणून ओळखले जाते.या जंगल सत्याग्रहाच्या स्मृतीप्रित्यर्थ चिरनेर गावात दोन हुतात्मा स्मारक बांधलेली आहेत. या स्मारकाच्या शेजारी हुतात्मा स्मारक शिल्प उभारण्यात आलेले असून या स्मारक शिल्पात हुतात्म्यांची शिल्प उभारण्यात आलेली आहेत. त्याचबरोबर १९३२ साली पाडलेल्या स्मृतिस्तंभाचा कळस ह्या स्मारक शिल्पात जतन करून ठेवला आहे. त्याचबरोबर सत्याग्रहाच्या वेळी झालेल्या गोळीबारात एक गोळी महागणपती मंदिराच्या गजाला लागली. तो गज सत्याग्रहाची आठवण म्हणून मंदिरात अजूनही जतन करून ठेवण्यात आलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here