धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील) – कोरोना विषाणूने आपल्यातून अनेक चांगल्या लोकांना हिरावून नेले आहे. आजचा दिवस (दि.२६) धरणगावकरांसाठी दुःख घेऊनच उगवला. धरणगावातील अजातशत्रू व्यक्तिमत्व पी.आर. हायस्कूलचे शिक्षक शरदकुमार बन्सी यांचे निधन झाले.
दुसऱ्यांच्या सुखात स्वतःचे सुख मानणारा मनमिळावू स्वभावाचे शरदकुमार बन्सी हे समाजातील सर्व स्तरातील लोकांना परिचित असणारे व्यक्तिमत्व होते. लोकमतचे तालुका प्रतिनिधी, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक, बालाजी वाहन मंडळाचे संचालक, चर्मकार समाजाचे जिल्हा सदस्य असे बहुआयामी व्यक्तिमत्व काळाने आज हिरावून नेले आहे. त्यांच्या दुःखद निधनाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी दुःख व्यक्त केले असून, त्यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
अभ्यासू पत्रकार गमावला – प्रा.पी.एम.पाटील
धरणगाव शहरातील अतिशय दुःखद आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना असे आमचे मार्गदर्शक , अभ्यासु पत्रकार , हाडाचा शिक्षक , गावासाठी व शिक्षकांसाठी झगडणारं व्यक्तिमत्त्व म्हणजेच आदरणीय शरदकुमार बन्सी सर अचानक आम्हाला सोडुन गेल्याने मन सुन्न झालं…भावपूर्ण श्रद्धांजली सरजी
शरद मित्रा तू अकाली गेला, धरणगावने हिरा गमावला : प्रा.बी.एन.चौधरी
शरद, मित्रा…………. तू फसवून गेला, देवा तू काळजाचा, तुकडा तोडून नेला ! धरणगावकरांचा अजातशत्रू मित्र. पी. आर. हायस्कूलचा कोहिनूर हिरा. लोकमतचा तालुका प्रतिनिधी. माध्यमिक शिक्षक पतपेढीचा संचालक. बालाजी वाहन मंडळाचा संचालक. चर्मकार समाजाचे जिल्हा सदस्य. माझा लहानबंधूतुल्य जीवलग मित्र शरदकुमार रामलाल बन्सी आज काळाच्या पडद्याआड गेला ! शब्द मुके झाले. भावपूर्ण श्रद्धांजली !
धक्कादायक वार्ता : अॅड. हरीहर पाटील
आमचे मोठे बंधु श्री. ईश्वर रामलाल बन्सी यांचे लहान भाऊ शरद बन्सी यांच्या निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक व दुःखदायक आहे. त्यांच्या आत्म्यास शांती व सदगती लाभो! सदर घटनेमुळे कोरोनाचे गांभीर्य धरणगावकरांनी लक्षात घेवून आपल्या वागणूकीत बदल करतील अशी अपेक्षा आहे.







