नवी दिल्ली – महाराष्ट्रातील भाजपचे जेष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना पक्षाने पुन्हा डावलले आहे. राज्यातील भाजप नेत्यांवर नाराज असलेल्या एकनाथराव खडसेंना राष्ट्रीय कार्यकारणीत संधी मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पंरतु, त्यांना नड्डांच्या टीममध्ये स्थान देण्यात आलेले नाही.
एकनाथराव खडसे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने फडणवीसांविरोधात जाहीरपणे बोलत आहेत. आपल्याला मुद्दाम डावलल्याची खंत बोलून दाखवत त्यांनी महाराष्ट्र भाजपवर टीका केली होती. कदाचित याचमुळे केंद्रीय पातळीवरील भाजप नेतृत्वाने पुन्हा एकदा एकनाथराव खडसेंकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. श्री.खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. यामुळे देखील त्यांना संधी देण्यात आले नसल्याची चर्चा रंगली आहे.
विनोद तावडेंना विधानसभेचे तिकीट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून भाजप कार्यात आलेल्या तावडेंना तिकीट नाकारण्यात आल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. पंरतू, पक्षाकडून जी जबाबदारी देण्यात येईल त्याचा प्रामाणिकपणे स्वीकार करू अशी प्रतिक्रिया तावडेंकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यांच्यावर पक्षाने आता मोठी जबाबदारी सोपवत त्यांना राष्ट्रीय सचिव म्हणून दायित्व सोपवले आहे.
गत वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचे समोर आले होते. पराभव मुंडेंच्या बराच जिव्हारी लागला होता. पक्षश्रेष्ठींवर अप्रत्यरित्या नाराजी देखील मुंडेकडून व्यक्त करण्यात आली होती.
पक्षातील ओबीसी नेत्यांना एकत्रित करण्याचा प्रयत्नही मुंडेकडून मध्यंतरी करण्यात आला होता. त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा कुठेच जागा न मिळाल्यामुळे नाराजीच्या चर्चेला आणखी उधाण आलेले होते. अश्यात मुंडेंची मनधरणी करण्यात आली होती. पंरतू, आता पक्ष कार्यकारिणीत मोठी जबाबदारी पंकजा यांच्याकडे देण्यात आली आहे. यापूर्वीचे केंद्रात मुंडे यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचे संकेत पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आले होते.







